Sachin Ahir Reaction On Sanjay Raut ED Summons: संजय राऊतांना दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु आहे; सचिन अहिरांची प्रतिक्रिया
संजय राऊत ईडीकडून समन्स बजावणं अतंत्य दुर्दैवी आहे. आगळं वेगळं दबावतंत्र वापरलं जात आहे, हे यातून स्पष्ट होत आहे. ही चौकशी नंतर ही करता आली असती.
Sachin Ahir Reaction On Sanjay Raut ED Summons: राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असताना शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीकडून (ED) समन्स बजावण्यात आलं आहे. यावर शिवसेनेचे विधानपरिषदेतील नवनिर्वाचित आमदार सचिन अहिरांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत ईडीकडून समन्स बजावणं अतंत्य दुर्दैवी आहे. आगळं वेगळं दबावतंत्र वापरलं जात आहे, हे यातून स्पष्ट होत आहे. ही चौकशी नंतर ही करता आली असती. पण आज संजय राऊतांनी जी आघाडी घेतली आहे, त्यापासून त्यांना रोखण्याचा हा प्रयत्न होतोय का? पण तरी ही निर्भीडपणे ते जनतेसमोर वस्तुस्थिती मांडणार, असा विश्वास त्यांनी दर्शवला आहे.
सध्या आमदारांच्या निलंबनाची प्रक्रिया ही विधानसभा उपाध्यक्षांच्या टेबलवर सुरुये. त्यांनी अद्याप कोणता निर्णय घेतलेलाच नाही, तोपर्यंत यांनी याचिका न्यायालयात दाखल केली. मात्र माझ्या ज्ञानानुसार सर्वोच्च न्यायालय विधानसभेचा निर्णय येईपर्यंत यात हस्तक्षेप करणार नाहीत. घटनेनुसार जर हे झाले असते तर ते चाललं असतं. प्रत्येक न्यायलयात जाणे ही घाई झाल्याचं दिसतंय. शिवाय महाविकासआघाडीचा पाठिंबा काढून घेतला हे न्यायालयात सांगितले, म्हणजे न्यायालय शासनाला आदेश देतील. असं कधी होत नाही. घटनेनुसार विधिमंडळ त्यानंतर राज्यपालांकडे प्रकरण जातं. त्यामुळं तूर्तास तरी न्यायालयात जाऊन सांगणं हे घटनेत बसत नाही. मात्र शेवटी न्यायालय काय निर्णय देत हे पाहावं लागेल, असंही ते म्हणाले.
सध्या आपल्याला कोणी गुवाहाटीला बोलवत नाही. कारण त्यांना गरजच नाही. असं वक्तव्य शिवसेनेचे विधानपरिषदेतील नवनिर्वाचित आमदार सचिन अहिरांनी केल्याचं समोर आलं आहे. हे वक्तव्य करताना त्यांचा सूर हा मिश्किलतेचा होता. मात्र सध्या जो मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत असणारी व्यक्ती उद्या त्यांच्या गटात असेलच का? याची खात्री कोणी देत नाही आहे. म्हणूनच सचिन अहिरांच्या या वक्तव्याला घेऊन तर्क-वितर्क् लढवले जातायेत.
'या मला अटक करा' : संजय राऊत
ईडी समन्सनंतर संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत म्हटलंय की, "मला आताचा समजलं ED नं मला समन्स पाठवलं आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी... हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या... मला अटक करा! जय महाराष्ट्र!" धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी हे ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांना टॅग केलं आहे.