Shrikant Aadkar Pune : पुणेकरांचा नाद करायचा नाय! वय 78 वर्ष मात्र उत्साह अन् जिद्द अफाट; श्रीकांत आडकरांनी जिंकली पॉवर लिफ्टिंग स्पर्धा
पुण्यातील एका 78 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांनी करुन दाखवलं आहे. श्रीकांत आडकर असं या ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे. त्यांनी जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा जिंकली आहे.
Shrikant Aadkar Pune : पुणेकरांच्या अनेक (Pune) करामतींची राज्यभर (Shrikant Aadkar) चर्चा होते. त्याचप्रमाणे त्यांच्या कार्याचं देखील सगळीकडे कौतुक केलं जातं. तुमच्यात इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कोणत्याही वयात काहीही करु शकता. हेच सगळं पुण्यातील एका 78 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकानं करुन दाखवलं आहे. श्रीकांत आडकर असं या ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे. त्यांनी जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा जिंकली आहे. जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 50 किलो वजन उचलण्यात यशस्वी झाले आहेत. तरुणांना लाजवेल अशा त्यांच्या या फिटनेसची चर्चा सध्या शहरात होत आहे.
'सातत्य आणि शिस्त माणसाने बाळगली तर माणूस कोणतंही यश प्राप्त करु शकतो'
ते म्हणातात, सातत्य आणि शिस्त माणसाने बाळगली तर माणूस कोणतंही यश प्राप्त करु शकतो. माझं वय 78 वर्ष आहे. मी नोकरी करायचो. मला लहानपणापासून खेळाची आवड होती. त्यामुळे मी अजूनही नियमीतपणे व्यायाम करतो. मी कर्वेनगर येथील सोमण क्लबच्या राजहंस मेहंदळे यांच्याकडे पॉवरलिफ्टिंगचा व्यायाम करतो. त्यांनीच मला डेडलिफ्टचीदेखील तयारी करण्यास सांगितलं त्यानुसार मी सराव सुरु केला होता. वाढत्या वयाचा मी कधीही विचार करत नाही मला वाटेल ते आणि आवडेल ते मी कायम करतो, असं श्रीकांत आडकर सांगतात.
वयाच्या 78 व्या वर्षी पॉवरलिफ्टिंग करणं माझ्यासाठी आव्हान होतो. वयामुळे शरीरात मोठे बदल होत असतात. हाडेदेखील ठिसूळ होतात. त्यामुळे मणक्यावर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. माझ्या ट्रेनरने माझा रोज सराव करुन घेतला. त्यानंतर त्यांना माझ्या आरोग्याचाही अंदाज आला. माझ्या सरावाचा योग्य आढावा ट्रेनर रोज घेत होते. त्यांनी बारीकसारीक गोष्टींवर लक्ष दिलं आणि मी स्पर्धेत उतरलो आणि जिंकलोदेखील, असंही ते सांगतात.
मला कशाचेही व्यसन नाही. मी नेहमीच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. योग्य वेळी जेवण आणि झोप घेतली तर माणूस तंदुरुस्त राहतो. माझे वडील एक पोलिस अधिकारी होते आणि यामुळे कुटुंबातील प्रत्येकाने स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम केला पाहिजे, असं ते नेहमी सांगायचे. त्यांच्यामुळे आम्हाला शिस्त लागली. नियमित व्यायामाने मला मदत केली. जर तुम्ही तुमचे शरीर निरोगी ठेवले आणि नियमित व्यायाम केला तर वयाच्या 80 व्या वर्षीही तुम्ही तंदुरुस्त राहू शकता, असंही ते म्हणाले. मी तरुण असताना पुणे श्री आणि इतर अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यावेळी देखील मी रोज व्यायाम करत होते. व्यायामाचे अनेक फायदे आहेत. व्यायामात सातत्य असल्याने मी 78 व्या वर्षीही एखाद्या तरुणाला कोणत्याही स्पर्धेत हरवू शकतो, असंही त्यांनी मिश्किल भाषेत सांगितलं.