(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Rikshaw : रिक्षाचालकांना चक्काजाम आंदोलन पडलं महागात ; 37 रिक्षाचालकांना अटक
बेकायदेशीर आंदोलन करून सर्वसामान्य पुणेकरांना वेठीस धरल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी विविध कलमांनुसार रिक्षाचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 37 रिक्षाचालकांना अटक करण्यात आली आहे.
Pune Rickshaw : पुण्यातल्या रिक्षाचालकांनी 12 डिसेंबर रोजी केलेलं चक्का जाम आंदोलन त्यांना भोवलं आहे. बेकायदेशीर आंदोलन करून सर्वसामान्य (Rickshaw) पुणेकरांना वेठीस धरल्याप्रकरणी पुणे (Pune) पोलिसांनी विविध कलमांनुसार रिक्षाचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातल्या रिक्षाचालकांविरोधातला गुन्हा बंडगार्डन पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांच्यासह 37 जणांना अटक करण्यात आली आहे.
पुण्यातल्या रिक्षाचालकांना पोलिसांनी आंदोलन करू नका म्हणून कलम 149 नुसार नोटीस बजावली होती. पण त्यानंतरही दहा रिक्षा संघटनांनी आधी पुण्यातल्या आरटीओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर रिक्षाचालकांनी रस्त्याच्या मधोमध रिक्षा लावून रस्ते वाहतुकीसाठी बंद केले. अखेर पोलिसांनीच स्वत: त्या रिक्षा बाजूला करून रस्ते वाहतुकीसाठी खुले केले. पुण्यात आज परिस्थिती नियंत्रणात होती. शहरातली वाहतूक सुरळीत होती. पण अजूनही काही रिक्षाचालक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
पोलिसांनी केली रिक्षाचालकांवर कारवाई
पुण्यात रिक्षा चालकांनी बेकायदा बाईक-टॅक्सी विरोधात काल अनोखं आंदोलन केलं. संगम ब्रीज येथील आरटीओ कार्यालयासमोर मोठ्या संख्येने रिक्षा चालक या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान अनेक रिक्षा चालकांनी आपली रिक्षा ही रस्त्यावरच सोडून दिली. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सुमारे 16 रिक्षा संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. रस्त्यात रिक्षा सोडल्यानं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. रात्री आठ वाजल्यानंतर दंगल नियंत्रण पथक रस्त्यावर उतरलं. हजार एक पोलीस रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी रिक्षाचालकांना रिक्षा हटवण्याचं आवाहन केलं. मात्र रिक्षाचालकांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला तुरी
काही दिवसांपूर्वीच रिक्षाचालकांना जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आंदोलन न करण्याचं आवाहन रिक्षाचालकांना केलं होतं. मात्र रिक्षाचालक त्यांच्या मागणीसाठी आक्रमक झाल्याचं चित्र आहे. जिल्हा प्रशासनाने रिक्षाचालकांच्या न्याय मागण्यांबाबत नेहमीच सहानुभूतीने विचार केला आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर वाहतूक होऊ नये यासाठी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. बेकायदेशीर बाईक टॅक्सी ॲप चालवणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र रॅपिडो बाईक बंद होईपर्यंत चक्काजाम असाच सुरु राहणार, अशी भूमिका रिक्षाचालकांनी घेतली होती. मात्र त्याच रिक्षाचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.