Pune News : पुणे महापालिकेच्या वॉर्ड रचनेचा प्रारुप आरखडा जाहीर, 41 प्रभाग ,165 नगरसेवक, हरकती मागवल्या
PMC Election : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारुप वॉर्डरचना जाहीर करण्यात आली आहे. या प्रारुप रचनेवर हरकती मागवण्यात आल्या आहेत.

पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसुरु आहे.आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी महापालिकेकडून वॉर्ड रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. पुण्यात आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकूण 41 प्रभाग असणार आहेत. यात 40 प्रभाग चार सदस्यीय असतील तर एक प्रभाग पाच सदस्यीय असेल.
पुणे महानगरपालिका क्षेत्राची एकुण लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 34,81,359 इतकी असुन अनुसूचित जातीची लोकसंख्या 4,68,633 इतकी आहे, व अनुसूचित जमातीची लोकसंख्या 40,687 इतकी आहे. तसेच निवडून द्यावयाच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या 165 आहे. एकूण 41 प्रभागांपैकी प्रभाग क्र. 38 हा 5 सदस्यीय असून उर्वरित 40 प्रभाग 4 सदस्यीय आहेत.
प्रारूप प्रभाग रचना संदर्भात नागरिकांच्या हरकती/ सूचना दिनांक 22/08/2025 ते दि. 03/09/2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत व दि. 04/09/2025 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत पुणे मनपा भवन स्वागत कक्ष, पुणे मनपाची सर्व क्षेत्रीय कार्यालये व निवडणूक कार्यालय, स्वा.वि.दा. सावरकर भवन या ठिकाणी लेखी स्वरुपात स्वीकारण्यात येतील.
इतर महापालिकांची प्रभागरचना लवकरच
राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबई महापालिका सह गट अ ब आणि क वर्गातील महापालिकांच्या प्रभाग रचना 25 ऑगस्टला प्रसिद्ध करणार असल्याची माहिती देण्यात आली होती. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे आणि त्यावर हरकती सूचना मागवणे यासाठी देखील वेळ दिला जाणार आहे. मात्र, काही महापालिकांचे प्रारूप प्रभाग रचना प्रस्ताव हे उशिरा राज्य निवडणूक आयोगाला महापालिकांकडून प्राप्त झाल्याने सोमवारी प्रभाग रचना प्रसिद्ध करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
29 पैकी दहा महापालिकांच्या प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाला प्राप्त झाले आहेत व गट ड च्या महापालिकांच्या प्रभाग रचना संबंधित महापालिकांकडून प्राप्त होत असल्याची माहिती आहे. मुंबई, नागपूर,पुणे,ठाणे,नाशिक, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजी नगर, वसई विरार,नवी मुंबई या महापालिकांच्या प्रभाग रचना संबंधित महापालिकांकडून राज्य निवडणूक आयोगांकडे प्राप्त झाली असल्याची माहिती आहे. सोमवारी यातील बहुतांश महापालिका प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न राज्य निवडणूक आयोगाकडून केला जाईल.























