Pune Monsoon Update: किती टक्के पेरणी, कुठे दरड कोसळल्याच्या घटना, किती मृत्यू; काय आहे पुण्याच्या पावसाची स्थिती?
पुणे जिल्हात आतापर्यंत 30 टक्के क्षेत्रावर पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यात भातशेती आणि बाकी पिकांचा समावेश आहे. 46000 हेक्टरवर पिकाची लागवड झाली आहे.
Pune Monsoon Update : पुणे जिल्हात आतापर्यंत 30 टक्के क्षेत्रावर पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यात भातशेती आणि बाकी पिकांचा समावेश आहे. 46000 हेक्टरवर पिकाची लागवड झाली आहे. असाच पाऊस सुरु राहिला तर पिक लागवडीचं प्रमाण वाढणार आहे. पुढचे दोन दिवस शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र पुण्यात मागील दोन दिवस पावसाची नेमकी स्थिती काय होती?, कोणत्या परिसरात काय स्थिती होती? याचा आढावा घेण्यात आला आहे.
खेड तालुक्यातील धुवोली ते शिरगाव दरम्यान दरड कोसळली. त्यामुळं वाडा ते भोरगिरी हा भीमाशंकर कडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. जेसीबीच्या साह्याने रस्ता मोकळ्या करण्याचे काम चालू आहे. यात कोणतीही जीवित हानी नाही झाली. त्यासोबतच वरंधा घाटामध्ये ठिकठिकाणी संभाव्य दरड कोसळण्याची शक्यता असल्याने, वरंधा घाट ( पुणे- भोर महाड ) महामार्गावरील धोकादायक असलेला भाग कि.मी. 81/600 ते कि.मी. 87/600 हे अंतर अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे . तसेच पुणे जिल्हयामध्ये भारतीय हवामान विभागाच्या यलो, ऑरेंज आणि रेड अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार दुचाकी, तीन चाकी व हलकी वाहने तसेच इतर सर्व प्रकारच्या वाहानांच्या वाहतुकीकरीता रस्ता बंद करण्यात आलाय. तर या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाव्दारे म्हणजेच " पुणे- पिरंगुट - मुळशी - ताम्हिणी घाट निजामपूर माणगाव महाड " या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे .
घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोखरी घाटामध्ये दरड कोसळली होती सदर दरड हटवून वाहतूक सुरू करण्यात आली आहे . दिनांक 11 जुलैला आंबेगाव तालुक्यातील मौजे जवळे येथील लायगुडे मळा येथील घराची भिंत व कवले कोसळुन त्यामध्ये एक महिला श्रीमती रंगुबाई धोंडिबा काळे ( वय 50 वर्ष ) यांचा मृत्यू झाला.
सध्या खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग मुठा नदीच्या पात्रात सोडला जात आहे. त्यामुळे शेजारच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.