एक्स्प्लोर
फाशी रद्द करुन जन्मठेप द्या, बीपीओ कर्मचारी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींची हायकोर्टात याचिका
2007 मध्ये पुण्यातील गहुंजे इथे एका बीपीओ कर्मचाऱ्यावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणातील दोघा दोषींना 24 जून रोजी फाशी देण्यात येणार आहे.

मुंबई : फाशीची शिक्षा देण्यात झालेल्या विलंबामुळे जगण्याची उमेद वाढवली आहे. त्यामुळे फाशी रद्द करुन जन्मठेप द्या, अशी मागणी बलात्कार प्रकरणातील दोषींनी केली आहे. तीन आठवड्यांवर फाशीची तारीख आली आसताना पुण्यातील गहुंजेमधील बीपीओ कर्मचाऱ्यावर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या दोन दोषींनी मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल केली आहे.
साल 2007 मध्ये पुण्यातील गहुंजे इथे एका बीपीओ कर्मचाऱ्यावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणातील दोघा दोषींना 24 जून रोजी फाशी देण्यात येणार आहे. त्याबाबतचे वॉरण्ट बजावण्यात आलं आहे. राष्ट्रपतींनी दोन वर्षांपूर्वी या दोघांचा दयेचा अर्ज फेटाळला होता. "दयेचा अर्ज फेटाळण्यात आल्यांतर फाशीची अंमलबजावणीत झालेल्या उशिरामुळे आमच्या जगण्याच्या मुलभूत अधिकारावर घाला घातला जातोय," असा दावा करत या दोन्ही आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरुवारी (6 जून) दुपारी 3 वाजता सुनावणी होणार आहे.
या आरोपींची नावे पुरुषोत्तम बोराटे आणि प्रदीप कोकडे अशी आहेत. पुणे सत्र न्यायालयाने 10 एप्रिल रोजी येत्या 24 तारखेला फाशी देण्यासंबंधीचे वॉरण्ट जारी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 8 मे 2015 रोजी या दोघांच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर राज्यपालांनी 2016 मध्ये तर राष्ट्रपतींनी साल 2017 मध्ये त्यांच्या दयेचा अर्ज फेटाळून लावला. सध्या हे दोघे पुण्यातील येरवडा कारागृहात आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार दयेच्या अर्जावर तीन महिन्यांत निर्णय घेणं आवश्यक आहे. मात्र या प्रकरणात याला दोन वर्ष लागली आणि त्यानंतर फाशीची तारीख ठरवण्यात आणखी दोन वर्ष गेली. त्यामुळे शिक्षा सुनावल्याच्या दिवसापासून आरोपी आणि त्यांचे कुटुंबीय दररोज मरणाच्या सावटाखाली जगत आहेत. तसेच शिक्षेची अंमलबजावणी होण्यात लागणाऱ्या विलंबामुळे त्यांची शिक्षा माफ होईल अशी आशा निर्माण होतेय. त्यामुळे ही फाशी रद्द करुन त्यांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
या प्रकरणातील आरोपी प्रदीप कोकडे याने आपल्या याचिकेत दावा केलाय की, घटनेच्यावेळी त्याचं वय हे केवळ 19 वर्ष होतं. हा निकाल देताना त्याच्या वयाचा विचार करता त्याला सुधारण्याची संधी मिळायला हवी होती. मात्र तसं झालं नाही, त्यामुळे त्याच्यावर मानसिक परिणाम झाला आहे. मात्र त्यातून सावरत त्याने जेलमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. या गोष्टीही विचारात घेतल्या गेल्या नाहीत.
काय आहे प्रकरण?
पीडित महिला मूळची गोरखपूरची होती. नोकरीच्या अखेरच्या दिवशी बोराडे आणि कोकडे यांनी तिला तिच्या घरातून कार्यालयात नेण्यासाठी कंपनीच्या गाडीत बसवले. मात्र दुसऱ्या दिवशी ती घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. तिचा मृतदेह पोलिसांना 2 नोव्हेंबर 2007 रोजी गहुंजे येथे आढळला होता. या प्रकरणी बोराडे आणि कोकडे यांना अटक करण्यात आली होती. मार्च 2012 मध्ये पुणे सत्र न्यायालयाने दोघांना दोषी ठरवले आणि फाशीची शिक्षा ठोठावली. मुंबई उच्च न्यायालयाने आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली.
मुंबईतील बॉम्बस्फोटप्रकरणी 30 जुलै 2015 रोजी याकूब मेमन याला फाशी देण्यात आले होते. त्यानंतर राज्यात या दोघांना फाशी देण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
व्यापार-उद्योग
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
