Mahadev Jankar : अजित पवारांनी माझा प्रचार केला, बारामतीत प्रचार करणं माझं कर्तव्य - महादेव जानकर
अजित पवारांनी माझा प्रचार केला आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करणं माझं कर्तव्य आहे. त्यासोबतच मी एकदिवस पंतप्रधान होणार आहे, असंही जानकर म्हणाले.
पुणे : मी परभणीतून खासदार झालो आहे आणि केंद्रात मंत्रीदेखील होणार आहे. सगळ्या विकास कामांसाठी निधी आणणार आहे, असा विश्वास महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकरांनी (Mahadev Jankar) व्यक्त केला आहे. ते बारामतीत सुनेत्रा पवारांच्या (Sunetra Pawar) प्रचार करत आहेत. अजित पवारांनी माझा प्रचार केला आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करणं माझं कर्तव्य आहे. त्यासोबतच मी एकदिवस पंतप्रधान होणार आहे, असंही जानकर म्हणाले.
माझी परभणीची निवडणूक झाली म्हणून मी बारामतीत आलो आहे. अजित दादांनी मला तिकीट दिले तिकडे माझा प्रचार केला म्हणून मी इकडे प्रचाराला येणं हे माझं कर्तव्य आहे, असं महादेव जानकर म्हणाले. बारामतीतील सगळं मला माहिती आहे. गावागावात फिरलो आहे. त्यामुळे बारामती काही माझ्यासाठी नवीन नाही. बारामतीनं मला राष्ट्रीय नेता केला. बारामतीकरांनी माझ्यावर खूप प्रेम दिलं आहे. आता बारामतीकरांना सुनेत्रा वहिनींना मतदान कर, असं आवाहन करणार आहे. सुनेत्रा पवार जिंकून येणं हे माझ्यादेखील प्रतिष्ठेची आहे असं जानकर म्हणाले.
मी परभणीत विजयी झालो आहे. आता फक्त चार तारखेला कलेक्टरकडून निवडून आल्याचं लेटर घ्यायलं आहे. मी साधारण 45 ते 50 हजार मतांनी निवडून येणार आहे. साधारण माढा आणि परभणीमध्ये मला महायुतीकडून जागा मिळण्याची शक्यता होती. त्यात परभणीतून जागा मिळाली. महाविकास आघाडीशीदेखील बोलणं सुरु होतं. मी महाविकास आघाडीला तीन जागा मागितल्या होत्या मात्र त्यांनी एकही दिली नाही. मात्र दुसरीकडे महायुतीनं मला 90 टक्के वाटा दिला. देऊ म्हणणं आणि देणं यात फरक आहे, त्यासोबतच जिथं पक्षाला फायदा आहे तिथे जायला हवं, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मी पंतप्रधान होणार...
एक दिवस मी पंतप्रधान होणार आहे. आता माझ्या पक्ष मोठं करण्याचं काम सुरु आहे. त्यात मी चार आमदारांना जन्म दिला आहे. आता चार राज्यात माझा पक्ष आहे. येत्या काळात मोठ्या प्रमाणात पक्ष वाढवू आणि एक दिवस मी पंतप्रधान होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
परभणीत महादेव जानकर आणि संजय जाधव आमने-सामने
महायुतीने परभणी लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्याविरुद्ध ठाकरे गटाने विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांना मैदानात उतरवले आहे. संजय जाधव गेल्या 10 वर्षांपासून परभणीचे खासदार आहेत. त्यामुळे विजयाची हॅटट्रीक करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात ओबीसी आणि मराठा समाजाची लोकसंख्या आहे. त्यामुळे लोकसंख्येचा विचार करुनच जानकर यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.