Lakshman Hake Shivsena: शिवसेनेत इनकमिंग सुरु; ओबीसी आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांचा शिवसेनेत प्रवेश
सर्वसामान्य माणसांना नेतृत्व देणारी शिवसेना, त्यांच्या प्रत्येक प्रश्नांसाठी रस्त्यावरती लढणारी शिवसेना यापुढे नव्या रुपात दिसेल, असा विश्वास त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर व्यक्त केला आहे.
Lakshman Hake Shivsena: मागास वर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके (Lakshman Hake) यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधलं आहे. शिवसेनेतील अरविंद सावंत, विनायक राऊत यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
शिवसेनेत गेल्यानंतर आपल्या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते. अठरा पगड जातींसाठी शिवसेना काम करते. माझा प्रवेश झाल्यानंतर हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. रात्रंदिवस फिरणारा माणूस आहे. सर्वसामान्य माणसांना नेतृत्व देणारी शिवसेना, त्यांच्या प्रत्येक प्रश्नांसाठी रस्त्यावरती लढणारी शिवसेना यापुढे नव्या रुपात दिसेल, असा विश्वास त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर व्यक्त केला आहे.
जे. पी. नड्डा यांच्या म्हणण्यावरुन पक्ष संपत नाही त्यांनी महाराष्ट्रात येऊन महिन्याभरात माजी मंत्री आदित्य ठाकरेंच्या सभा आणि रॅली यावर एक नजर टाकावी. भाजपच्या मोठ्या आयटी सेलचा त्यांनी फिडबॅक घ्यावा. महाराष्ट्रातील माणसांचा अभ्यास करावा. यापुढे शिवसेनापक्ष महाराष्ट्रात एक नंबरवर असेल, अशा शब्दात त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. सत्तेसाठी अनेकांनी शिवसेनेत फुट पाडली. मात्र आमच्या सारखे हजारो होतकरु शिवसेनेत प्रवेश करु आणि शिवसेना वाचवू, असं देखील ते म्हणाले.
यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि शाहू- फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुषमा अंधारे यांनी शिवबंधन बांधलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून आऊटगोईंग सुरु होतं. पण आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरु झालं आहे.
कोण आहेत लक्ष्मण हाके?
-मागास वर्गीय आयोगाचे सदस्य आहेत.
-लक्ष्मण हाके हे सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत.
-पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
-फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे.
-2019 च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.