Ncp Agitation : भोंग्याचे नको विकासाचे राजकारण हवे, पुण्यात वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादीचे भोंगा आंदोलन
पुण्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने वाढत्या महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.
Ncp Agitation in Pune : देशात सध्या वाढत असलेल्या महागाईच्या मुद्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. महागावरुन विरोधक सरकारला धारेवर धरत असून एकमेकांवर राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरु आहेत. अशातच पुण्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने वाढत्या महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. महागाईच्या विरोधातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जुने भाषणे भोंग्यावर लावून राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले. हे भोंगा आंदोलन आंदोलन पुण्यातील गुडलक चौकात करण्यात आले.
केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ केली असल्याचा आरोप करत या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर भोंगा आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे ज्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेनी भोंग्यांच्या राजकारणाची सुरुवात केली ते राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या गुडलक चौकात राष्ट्रवादीने जवळपास 10 ते 12 भोंगे लावून थेट राज ठाकरेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.
देशात धर्माचा भोंगा नको तर विकासाचा भोंगा हवा असल्याचे यावेळी आंदोलक महिलांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार घोषणाबाजी केली. सध्या देशात भोंग्याचे राजकारण केले जात आहे. धार्मिक तेढ वाढवली जात आहे, म्हणूनच भोंग्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जुने भाषणे लावून आंदोलन करत असल्याचे पुणे राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. भाजप सरकार हे झोपलेले आहे. धर्म आणि जातीवरती राजकारण केले जात असल्याचे महिला आंदोलकांनी सांगितले.
सध्या जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईत मोठी वाढ झाली आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीने आज भोंगे लावून केद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले. पेट्रोल डिझेलच्या भावावरुन एकीकडे राजकारण चांगलंच तापलेलं असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आता सिएनजीच्या दराने 80 चा आकडा पार केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
इंधन दरवाढी विरोधात कोल्हापुरात तरुणांची सायकल रॅली
दरम्यान, वाढत्या महागाईच्या विरोधात कोल्हापूरमध्ये देखील आंदोलन उभा केले जात आहे. पेट्रोल-डिझेल, गॅसचे दर वाढले आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील मावळा ग्रुपने सायकल रॅली काढून आपला निषेध व्यक्त केला आहे. इंधनाचे दर इतके वाढले आहेत की, वाहने चालवणे आता शक्य नाही, म्हणूनच सायकलवरुनही रॅली काढली जात आहे. या रॅलीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक ऑडीओ क्लिप ऐकवली जात आहे. ज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत मोदी यांनी भाषण केले होते. महागाई संपवा नाहीतर आम्हाला संपवा अशा पद्धतीचे फलक घेऊन शेकडो तरुण आज रस्त्यावर उतरले आहेत.