Indapur News : शेकडो वर्षांपूर्वीचं झाड पाडताना बेफिकीरपणा, शेकडो पक्षी बेघर; पक्षीप्रेमींकडून कारवाईची मागणी
इंदापूर नगरपरिषदकडून झाडे पडताना योग्य ती खबरदारी न घेण्यात आल्याने देशी विदेशी पक्षांची मोठी वसाहत नष्ट झाल्याचा आरोप पक्षी प्रेमींनी केला आहे.
Indapur News : इंदापूर नगरपरिषदकडून झाडे पडताना योग्य ती खबरदारी न घेण्यात आल्याने देशी विदेशी पक्षांची (Birds) मोठी वसाहत नष्ट झाल्याचा आरोप पक्षीप्रेमींनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा सरदार वीर श्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील शेकडो वर्षांपूर्वीचे चिंचेचे झाड पाडताना हा प्रकार घडला आहे. या झाडावर गेली शेकडो वर्षे चित्रबलाक या पक्षांची मोठी वसाहत होती ती काही क्षणात नष्ट झाली आहे. घरटी उद्ध्वस्त झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने चित्रबलाक पक्षांसह वटवाघुळ, खारुट्या, सरडे देखील जागीच मरण पावले आहेत.
दरम्यान वृक्षतोड झाल्याचे समजतात दौंड येथील रेस्क्यू टीम, इको दौंड ही पक्षी रेस्क्यू टीम, आणि निमगाव केतकीचे फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबच्या सदस्यांनी जखमी पक्षांना कोसळलेल्या झाडातून रात्री उशिरापर्यंत बाहेर काढले. यामध्ये पंधराहून अधिक जखमी पक्षी वनविभागाच्या ताब्यात दिले आहेत. तर काही मृत झालेले पक्षी इंदापूर नगरपरिषदेच्या कचरा डेपोत नेऊन पुरुन टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पक्षीमित्र संघटना आणि इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने तीव्र शब्दात या घटनेचा निषेध केला असून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
अनेक पक्षी मृत्यूमुखी...
या चिंचेच्या झाडावर अनेक प्रकारचे पक्षी वास्तव्य करत होते. मात्र हे चिंचेचं झाड जेसीबी लावून नगरपरिषदेकडून पाडण्यात आलं. त्यापूर्वी या झाडावर कोणत्या पक्षाची घरटे किंवा वास्तव्य आहे का? हे पाहिलं गेलं नाही अचानक हे झाड पाडल्यामुळे पक्षी मृत्यूमुखी पडले आहेत. या सगळ्या पक्षांसदर्भात नगरपरिषदेने पत्राद्वारे किंवा फोन करुन वन विभागाला माहिती देणं गरजेचं होतं. मात्र त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नाही, त्यामुळे या पक्षांच्या नाहक जीव गेल्याचा आरोप पक्षी प्रेमींनी केला आहे.
पक्ष्यांची अंडेही फुटली...
ही सगळी पक्षांची वसाहत मागील अनेक वर्षांपासून या चिंचेच्या झाडावर आहे. त्यामुळे या झाडावर अनेक प्रकारच्या पक्षांची अंडेही या झाडावर आहेत. हे झाड पाडल्याने ज्याप्रमाणे पक्षांचा मृत्यू झाला, त्याचप्रमाणे अंडेही फुटले आहेत. यात काही देशी विदेशी पक्षांची देखील अंडे फुटले आहेत. त्यामुळे या पक्षांच्या प्रजाती काही प्रमाणात कमी किंवा नष्ट होऊ शकतात. यामुळे ज्यांनी ही कारवाई केली आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, असा आक्रमक पावित्रा या पक्षीप्रेमींनी घेतला आहे.