Pune Corona Update : पुणेकरांसाठी सर्वात आनंदाची बातमी; आज कोरोनामुळे एकही मृत्यू नाही
Pune Corona Update : आठ महिन्यानंतर पुण्यात पहिल्यांदाच कोरोनामुळे एकाही रुग्णाच्या मृताची नोंद नाही.
Pune Corona Update : पुणेकरांसाठी सर्वात आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. तब्बल आठ महिन्यानंतर म्हणजेच 6 फेब्रुवारी 2021 नंतर पहिल्यांदाच पुण्यात कोरोनामुळे एकाही मृताची नोंद नाही. पुणे शहर आणि ग्रामिण दोन्हीमध्ये आज, कोरोनामुळे एकाही मृताची नोंद नाही. दिवसभरात पुण्यात 112 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 118 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यातील एकूण पॉजिटिव्ह कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 503469 इतकी झाली आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या 988 इतकी झाली आहे. पुण्यातील मृताची संख्या 9067 इतकी झाली आहे. आतापर्यंत 493414 जणांनी कोरोनावर मात केली आहे. पुणे शहरात आज 5986 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
पुण्याचे महापौर मुरलीधर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी ट्विट करत म्हटलेय की, पुण्यात आज एकही कोरोनाबाधित मृत्युची नोंद नाही ! पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. आज तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. 6 फेब्रुवारी 2021 नंतर हा दिलासा आपल्याला पहिल्यांदाच मिळालाय.
पुण्यात आज एकही कोरोनाबाधित मृत्युची नोंद नाही !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 20, 2021
पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. आज तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. ६ फेब्रुवारी २०२१ नंतर हा दिलासा आपल्याला पहिल्यांदाच मिळालाय.
राज्यातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. राज्यात मंगळवारी 1638 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 791 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 24 हजार 547 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.42 टक्के आहे. राज्यात सध्या 26 हजार 805 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,09,798 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 928 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 12, 48 ,820 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
24 तासांत 14 हजार 623 नव्या रुग्णांची नोंद
देशात गेल्या 24 तासात 14 हजार 623 नव्या रुग्ण आढळून आले आहेत. तर, 197 मृत्युंची नोंद झाली आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या 4 लाख 9 हजार 651 वर पोहचली आहे. देशात सध्या 1 लाख 78 हजार कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. तर, गेल्या 24 तासात 19 हजार 446 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत एकूण 3 कोटी 34 लाख 78 हजार 247 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 996 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.