पुण्यात पाच दिवस अनलॉक, दोन दिवस लॉकडाऊन?
पुण्यातील दहा दिवसांच्या लॉकडाऊनचे फायदे येत्या काही दिवसांमध्ये दिसतील. रुग्णांची साखळी तुटल्याने रुग्ण संख्या काही दिवसांनी कमी येईल अशी अशा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पुणे : शहरात शुक्रवारपासून लॉकडाऊन नसेल पण दहा दिवसांपूर्वी सारखी सर्व प्रकारची सुटही नसेल असं पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केलंय. लॉकडाऊन उठवताना काही निर्बंध आम्ही कायम ठेवणार आहे असं जिल्हाधिकारी म्हणाले. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवार या दोन दिवशी इथून पुढे लॉकडाऊन घालण्याचा आमचा विचार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
यावेळी त्यांनी त्याचबरोबर लग्न समारंभात किती लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी द्यायची याचाही विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. लग्न समारंभांसाठी आधी 50 व्यक्तींना परवानगी दिली होती पण आता लग्नासाठी आणखी कमी लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी देण्याचा विचार आहे असं ते म्हणाले आहेत. गर्दी टाळण्यासाठी काही निर्बंध घालण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली आहे.
पुण्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत माहिती देताना ते म्हणाले, शहरात आज 48 व्हेंटीलेटर्स लोकांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलंय. अनेकदा जेव्हा रुग्ण अत्यवस्थ होतात तेव्हा हॉस्पिटलमधे आणले जातात आणि त्यामुळे मृत्यू होतात. पुण्यात बेडची कोणतीही कमतरता नाही असा दावा त्यांनी केला आहे. पुण्यातील दहा दिवसांच्या लॉकडाऊनचे फायदे येत्या काही दिवसांमध्ये दिसतील. रुग्णांची साखळी तुटल्याने रुग्ण संख्या काही दिवसांनी कमी येईल अशी अशा त्यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊनच्या दहा दिवसांच्या कालावधीत एक लाखांहून अधिक टेस्ट केल्या आहेत. टेस्ट वाढवल्याने रुग्णांची संख्या वाढल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.
रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरा
डॉक्टरांवर लक्ष ठेवण्यासाठी कोरोना सेंटरमधे आम्ही सीसीटीव्ही बसवतो आहोत . या सीसीटीव्हीचे फुटेज प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच पाहण्यासाठीच उपलब्ध असेल. कोरोना सेंटरमधे डॉक्टर येत आहेत का ? किती वाजता आणि किती वेळासाठी येत आहेत याची माहिती मिळणं यामुळे शक्य होणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यानी म्हटलयं. सिनियर डॉक्टर सेंटरला जात आहे का? आणि तेथील परिस्थिती काय होती हे समजावे यासाठी सीसीटीव्ही बसवतो आहोत. हे सीसीटीव्ही फुटेज सिव्हील सर्जन, प्रशासकीय अधिकारी यांना पाहण्यासाठी उपलब्ध असेल असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.
संबंधित बातम्या :
पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर वेग मर्यादा ओलांडणाऱ्यांना एक हजाराचा दंड, कारवाईसाठी फास्ट टॅगचा वापर