मुलगा लंडनमध्ये, मुलगी पुण्यात; एकमेकांना प्रत्यक्ष न पाहताच पसंती आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साखरपुडाही संपन्न
साखरपुडा व्हिडीओ कॉलवर झाला असला तरी लग्नासाठी अनलॉकची वाट पाहिली जाणार आहे. लंडनहून शहा कुटुंबिय इथे येतील तेव्हा पुढचं नियोजन केले जाईल. पण सरकारच्या नियमानुसारच लग्न पार पाडण्यात येईल, असं पूजाचे वडील मनोज कोया यांनी सांगितलं.
पिंपरी चिंचवड : आजवर कुणी पाण्याखाली, कुणी पॅराशूटमध्ये तर कुणी शिखरावर जाऊन लग्न-साखरपुडे पार पाडल्याचं आपण ऐकलंय, पाहिलंय. पण कोरोनामुळे एक साखरपुडा असा पार पडलाय, यात मुलगा-मुलगी दोघे ही एकमेकांसमोर नव्हते. लॉकडाऊनमुळे मुलाचं वऱ्हाड लंडनहून इथं येऊच शकलं नाही. त्यामुळे झूम व्हिडीओ कॉलवर पाहुण्यांच्या साक्षीने साखरपुडा पार पाडण्यात आला. इतकंच नव्हे तर मुला-मुलीने एकमेकांना प्रत्यक्षात न पाहताच, व्हिडीओ कॉलवरच पसंती दर्शवली आहे.
पिंपरी-चिंचवडची पूजा कोया ही तरुणी शिक्षिका आहे. मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिल्याने कुटुंबियांनी तिचं लग्न करण्याच्या हालचाली सुरू केल्या. लॉकडाऊनपूर्वीच पूजाला स्थळं येणं सुरु झालं होतं. पण पसंती झाली नव्हती. अशात कोरोनाने शिरकाव केल्याने देशात लॉकडाऊन सुरू झालं. त्यामुळे पूजाच्या स्थळं पाहण्यात खोळंबा आला. अशातच लंडनमध्ये फार्मासिस्ट म्हणून काम करणाऱ्या ऋषभ शहाचे तिला स्थळ आले. स्थळ मुलीला साजेसं होतं. कुटुंबियांच्या पसंतीला उतरलेला ऋषभ आणि पूजा एकमेकांना पाहणार कसे? हा प्रश्न व्हिडीओ कॉलच्या रूपाने निकाली लावण्याचं ठरलं. झूम व्हिडीओ कॉलवर दोघांनी संमती देताच, दोन्ही कुटुंबियांनी व्हिडीओ कॉलवरच साखरपूडा करायचं ठरवलं.
साखरपुड्याचा 28 जूनचा मुहूर्त होता. त्यानुसार पूजाच्या पिंपरी-चिंचवड येथील वाकडमधील घरात तर ऋषभच्या लंडनयेथील घरात संपूर्ण तयारी झाली. पूजा-ऋषभ नटून लॅपटॉपसमोर उभारले. साक्षीला पै-पाहुण्यांनी आपापल्या घरातून उपस्थिती लावली. व्हिडीओ कॉलवरून साखरपुड्याचा समारंभ सुरू झाला. ऋषभने लंडनहून पिंपरी चिंचवडमध्ये असणाऱ्या पूजाला व्हिडीओ कॉलद्वारे सर्वांसमक्ष लग्नासाठी साकडं घातलं. पूजाने ही ते स्वीकारलं आणि दोघांनी स्वतःच्याच हातात अंगठी घातली. अशाप्रकारे पूजा आणि ऋषभच्या नव्या इनिंगची सुरुवात झूम व्हिडीओ कॉलवर झाली.
पूजा म्हणते प्रत्येक तरुण-तरुणींप्रमाणेच आम्ही दोघांनीही साखरपुड्याबाबत काही स्वप्नं रंगवली होती. पण लॉकडाऊनच्या काळातच मी ऋषभला आणि ऋषभने मला पसंत केलं. व्हिडीओ कॉलवर जसा बघाबघीचा कार्यक्रम पार पडला, तसाच साखरपुड्याचा समारंभ घ्यायचं दोन्ही कुटुंबियांनी ठरवलं. आम्हीही कुटुंबियांच्या प्रेमाखातर आमची स्वप्नं बाजूला ठेऊन संमती दिली. त्यामुळे हा ऐतिहासिक क्षण माझ्या आयुष्यातला अविभाज्य घटक बनल्याचे पूजा सांगते.
साखरपुडा व्हिडीओ कॉलवर झाला असला तरी लग्नासाठी अनलॉकची वाट पाहिली जाणार आहे. लंडनहून शहा कुटुंबिय इथे येतील तेव्हा पुढचं नियोजन केले जाईल. पण सरकारच्या नियमानुसारच लग्न पार पाडण्यात येईल, असं पूजाचे वडील मनोज कोया यांनी सांगितलं. लॉकडाऊनमध्ये देशभरात पार पडणाऱ्या लग्न, साखरपुडा समारंभांना पन्नास वऱ्हाड्यांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आलीये. पण लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे जिथं जोडपे एकमेकांसमोर येऊच शकत नाहीत. त्यांच्यासाठी हे माध्यम अधिकच सुरक्षित असणार आहे.
इतर बातम्या