Girish Mahajan: खडसेंच्या हे होणारच होतं प्रतिक्रियेवर गिरीश महाजन म्हणाले, 'हा ट्रॅप होणार हे त्यांना माहीत होते तर जावयांना सांगायचं होतं...'
Girish Mahajan: असं होणार हे खडसेंना माहिती होतं तर, जावयांना त्यांनी अलर्ट केले पाहिजे होत मग, असं म्हणायला काही अर्थ नाही याबत चौकशी होईल. प्रत्येक वेळी आपल्या सोबत षडयंत्र कसं होतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

नाशिक: गेल्या काही दिवसांमध्ये भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळालं, अशातच खडसेचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीमध्ये सापडल्यानं त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे, या प्रकरणावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, मला या गोष्टींची काहीही माहिती नव्हती, मी काल पंढरपूरमध्ये होतो, रात्री उशीरा आलो मी झोपलो होतो, मला फोन आले होते, मी उठलो, त्यानंतर मी टिव्ही पाहिली तेव्हा मला या घटनेची माहिती समजली आहे. आता मला याबाबत काही माहिती देणं अशक्य आहे, मला याबाबत अद्याप काही माहिती नाही. हा तपासाचा विषय आहे, पोलिस याबाबत तपास करत आहेत, तपासामध्ये गोष्टी समोर येतील, असंही महाजन यांनी म्हटलं आहे.
काही झालं की यांनी केलं, त्यांनी केलं. षडयंत्र आहे असं म्हणणं चुकीचं आहे, असं काहीही नसतं, तपासामध्ये सर्व काही समजेल. - मला अजून काही माहिती नाही, मी ही बातमी टीव्हीवर बघितली. हेच आयोजक होते असं मला समजलं. त्या ठिकाणी पोलिसांना अंमली पदार्थ मिळून आले आहे. पोलिसांकडून माहिती समोर आली आहे, चाळीसगाव येथे मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ मिळून आला होता असे नाथाभाऊ बोलत होते, त्यानंतर आता त्यांचे जावई अशा पध्दतीने सापडले असल्याचं समजत आहे. हा सर्व तपासाचा भाग आहे. या प्रकरणात किती जण होते, किती महिला होत्या, किती पुरूष होते, ते नंतर समोर येईल, तपासामध्ये पाच की तीन महिला होत्या, हे नंतर समोर येईलच, त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या मिळून आल्या आहेत, असंही महाजन यांनी म्हटलं आहे.
हे होणारच होतं हे मला माहीत आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली, यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, हा ट्रॅप होणार हे त्यांना माहीत होते तर जावयांना सांगायचं होतं, त्यांना अलर्ट करायचं होतं, त्यांना सांगायला हवं होतं हे, असं कसं होऊ शकतं, खडसे यांचे जावई हे कोणी लहान नाहीत, त्यांना कडेवर उचलून तिथे ठेवले नाही. हे असं कसं होऊ शकतं. या प्रकरणात चौकशी होणे गरजेचे आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी ही माझी मागणी आहे, असंही पुढे गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
असं होणार हे खडसेंना माहिती होतं तर, जावयांना त्यांनी अलर्ट केले पाहिजे होत मग, असं म्हणायला काही अर्थ नाही याबत चौकशी होईल. प्रत्येक वेळी आपल्या सोबत षडयंत्र कसं होतं. जावई का लहान मुलगा नाही की त्याला रात्री उचलून नेऊन तिथे बसवण्यात आले, असंही महाजन यांनी म्हटलं आहे.
खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीतून अटक
एकनाथ खडसे यांचा जावईच पुण्यामध्ये रेव्ह पार्टी करताना रंगेहाथ सापडल्याने राज्यामध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना आज पुण्यामध्ये रेव पार्टीमध्ये रंगेहाथ हात पकडून अटक करण्यात आली आहे. ही रेव्ह पार्टी ऑनलाइन बुक केलेल्या खराडीमधील उच्चभ्रू भागातील महागड्या फ्लॅटमध्ये सुरू होती. या फ्लॅटमध्येच हुक्का, दारूसह अंमली पदार्थ सुद्धा सापडल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून खडसे आणि गिरीश महाजन यांच्या वादामध्ये जे टोक गाठलं होतं त्यानंतर आता ही थेट जावई सापडू कारवाई झाल्याने खडसे आणि गिरीश महाजन यांच्या वादामध्ये पुन्हा एकदा मोठी ठिणगी पडल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.























