Trupti Desai: फडणवीसांनी मुंडेंच्या मैत्रीखातिर करुणा शर्माला अनेकदा विमानाने माहेरी सोडलं; वाल्मिक कराड अन् दिंडोरीतील आश्रमाचा तृप्ती देसाईंचा दावा
Trupti Desai: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडे यांना वाचवत असतील तर मला वाटते की सत्तेवर या दोघांनाही राहण्याचा राहण्याचा अधिकार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरणं तापल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्यासह अन्य आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच वाल्मिक कराड निकटवर्तीय असल्याने मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. घटनेबाबत बोलताना त्या म्हणाल्या, धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्री धनंजय मुंडे यांचे मित्र असून अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांच्या मैत्री खातिर करुणा शर्मा यांना अनेक वेळा विमानाने माहेरी सोडलं आहे, असा दावा यावेळी तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी केला आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराड यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
त्या आश्रमाची चौकशी व्हावी
खंडणी प्रकरणात तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सध्या एसआयटीच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. खंडणी प्रकरणात जेव्हा वाल्मिक कराड याचा पोलीस शोधत होते, तेव्हा आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो आण्णासाहेब मोरे म्हणजे गुरू माऊली यांचं आश्रम आहे. तिथं 15 आणि 16 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि 17 तारखेला ते आश्रमाच्या बाहेर निघून गेले. त्यामुळे तिथं आश्रमात जर त्यांना आश्रय दिलं गेला असेल तर तेथील जे प्रमुख आहे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांना देखील सहआरोपी केलं पाहिजे. तसेच धक्कादायक बाब म्हणजे याच जानेवारी महिन्यात जेव्हा सीआयडीचं पथक हे तिथं आश्रमात गेलं होतं, तेव्हा त्यांना सीसीटीव्हीमध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दिसले होते. परंतु सीआयडीच्या पथकाने ते पुढं का सांगितलं नाही, याचा तपास देखील गृहमंत्री यांनी केला पाहिजे, अशी मागणी यावेळी तृप्ती देसाई यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस आश्रमाचे प्रमुख मोरे यांचे चांगले संबंध
त्या पुढे म्हणाल्या, ज्या महिलांनी माझ्याकडे तक्रार केली आहे. त्या महिलांनीही सांगितले आहे की, मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या आश्रमाचे प्रमुख मोरे यांचे चांगले संबंध असल्याने हे प्रकरणात उघडकीस येणार नाही. तसेच मागच्या वर्षी देखील जेव्हा या आश्रमात चुकीचे प्रकार घडत होते तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक घेत मध्यस्थी केली होती. अध्यात्मिक ठिकाणी जर अशा आरोपीला थारा दिलं जात असेल तर या आश्रमाच्या प्रमुख जे कोणी असतील त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी असं यावेळी देसाई म्हणाल्या आहेत.
मुख्यमंत्री मुंडे यांना वाचवत आहेत का?
मुख्यमंत्री धनंजय मुंडे यांना वाचवत आहेत का असा सवाल देखील यावेळी तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे. मंत्रिमंडळाबाबत सर्वस्वी निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात. ते जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री असले तरी महायुतीमध्ये आहेत इतके आरोप होऊन सुद्धा त्यांच्या जवळचा व्यक्ती आतमध्ये असून सुद्धा मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाहीत. याचाच अर्थ धनंजय मुंडे यांच्या मागे गृहमंत्री आहेत आणि त्यांची पाठराखण करत आहेत हे स्पष्ट होत आहे असं पुढे तृप्ती देसाई यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडे यांना वाचवत असतील तर मला वाटते की सत्तेवर या दोघांनाही राहण्याचा राहण्याचा अधिकार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं राज्यात काय चाललं आहे
या वाल्मिक कराडच्या अनेक बेनामी संपत्ती सापडत आहेत. अनेक गुन्हे समोर येत आहेत. हजारो लोक रस्त्यावर उतरत आहेत. व्यवस्थित रित्या घटनेचा तपास होत नाही. सीआयडी पथक नेमावे लागते, मध्येच एसआयटी पथक नेमावे लागते, काही अधिकारी निलंबित करावे लागतात, त्यांची बदली दुसरीकडे होते. नेमकं राज्यात काय चाललं आहे असा सवाल देखील त्यांनी पुढे बोलताना उपस्थित केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या जेव्हा करुणा शर्मा माझ्याकडे एकदा तक्रार घेऊन आल्या होत्या, तेव्हा मला त्यांनी सांगितलं जेव्हा मी इंदोरला माझ्या घरी माहेरी जायचे. तेव्हा कधी-कधी मला विमानातून सोडायला धनंजय मुंडे यांचे मित्र म्हणून फडणवीस सोडायला आलेले होते, धनंजय मुंडे यांचे मित्र जर देवेंद्र फडणवीस असतील, तर तपास सरळ मार्गे कसा होईल, त्या आश्रमाचा मी उल्लेख केला त्याचाही तपास झाला पाहिजे त्या मध्ये कोणाचे पैसे आहेत ते देखील समोर आलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.