देवेंद्र फडणवीस-अजित पवार एकाच व्यासपीठावर, पुण्यात कोविड सेंटरचे उद्घाटन करणार
महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जाहीररित्या तिसऱ्यांदा एकाच व्यासपीठावर येणार आहेत.उद्या, शुक्रवारी पुण्यात कोविड सेंटरचे उद्घाटन करणार त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
पुणे: महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जाहीररित्या तिसऱ्यांदा एकाच व्यासपीठावर येणार आहेत. उद्या, शुक्रवारी पुण्यात कोविड सेंटरचे उद्घाटन करणार त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. शपथविधीनंतर ते माढ्यात संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्न समारंभात एकाच व्यासपीठावर आले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावर लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाला मुंबईत अजित पवार उपस्थित होते. आता ही तिसरी वेळ आहे, ज्यावेळी दोघे एकत्रित दिसणार आहेत.
फडणवीसांच्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली होती. आता उद्या पुण्यात या मंचावर दोघे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
कोरोना संकटाच्या काळात पुणेकरांना जास्तीत जास्त ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू असून सीएसआरच्या माध्यमातून बाणेर येथे सहा मजली कोविड हॉस्पिटल उभारले आहे. या सेंटरचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
जम्बो सेंटरनंतर सर्व सुविधायुक्त दुसरे मोठे कोविड सेंटर पुणे शहरासाठी असणार आहे.
या सेंटरमध्ये 270 आॅक्सिजन आणि 44 व्हेंटिलेटर बेड्स असे एकूण 314 बेड्सची व्यवस्था आहे. ऑक्सिजनची कमी पडू नये, म्हणून 13 हजार लिटर क्षमतेचा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँक बसविण्यात आला आहे. तसेच बॅकअपसाठी 16 बाय 16आॅक्सिजन सिलिंडर, मॅनिफोल्ड, त्यासाठी शेड तसेच कॉम्प्रेसर व व्हॅक्युम पंप याची व्यवस्था केलेली आहे. वीजेच्या बॅकअपसाठी आयसीयु युपीएस व जनरेटर सुविधा करण्यात आली आहे.