Mumbai Pune Road: मुंबई ते पुणे प्रवास सुस्साट होणार, आता फक्त दोन तास लागणार, अटल सेतूला 8 लेनचा शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग जोडणार
Mumbai Pune Road: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. अटल सेतू शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने सातारा, सोलापूरला जोडला जाणार आहे. या नव्या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गामुळे मुंबई ते पुणे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.
मुंबई: पुणे ते मुंबई रस्तेमार्गे प्रवासाचा कालावधी लक्षणीयरित्या कमी करण्यात महत्त्वाची भूमिका असलेला शिवडी न्हावाशेवा सी लिंक महामार्ग म्हणजेच अटल सेतू आता शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने सोलापूर आणि साताऱ्याला जोडण्यात येणार आहे. या नव्या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गासाठी तब्बल 17 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या नव्या महामार्गामुळे अटल सेतुवरुन (Atal Setu) थेट सोलापूर आणि सातऱ्यासाठी रस्ता उपलब्ध होणार आहे. मात्र, त्याचवेळी मुंबई ते पुणे (Mumbai to Pune) प्रवासाचा कालावधी आणखी कमी होणार आहे. या नव्या महामार्गामुळे मुंबई ते पुणे प्रवासासाठी सध्या लागणाऱ्या वेळेत सव्वा ते दीड तासांची बचत होणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातील (एनएचआय) अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात हा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.
कसा असेल नवा महामार्ग?
नव्या प्रस्तावित महामार्गाद्वारे अटल सेतू आणि जेएनपीटी थेट पुणे, सातारा, सोलापूरला जोडले जाईल. तब्बल 130 किलोमीटर लांबीचा हा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग चौक-पुणे-शिवारे जंक्शन असा असेल. या मार्गावर वेगवान प्रवासासाठी एकूण 8 लेन असतील. या रस्त्याच्या बांधणीसाठी तब्बल 17500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून या महामार्गाची रुपरेषा तयार केली जात आहे.
मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर अनेकदा वाहतूक कोंडी होताना दिसते. याशिवाय, घाट परिसरात अनेकदा वाहनांच्या रांगा लागून प्रवासी तासनतास अडकून बसतात. एक्स्प्रेस वे लगत वाढलेले नागरीकरण आणि औद्योगिकरण यामुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या वाढत चालली आहे. यासाठी लोणावळा परिसरात मिसिंग लेन तयार केली जात आहे. मुंबई-पुणे प्रवासाचा कालावधी कमी करणाऱ्या या मिसिंग लेनचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, भविष्यात ही सुविधाही अपुरी पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अटल सेतू शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने सोलापूर आणि साताऱ्याला जोडण्यात आल्यास मोठा फायदा होऊ शकतो.
छत्रपती संभाजीनगर, बंगळुरुला जोडणार 14 पदरी महामार्ग
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच अटल सेतूला जोडणाऱ्या आणखी एका महामार्गाची घोषणा केली होती. त्यानुसार अटल सेतूवरुन खाली उतरल्यानंतर 14 लेन असणारा रस्ता तयार केला जाणार आहे. हा महामार्ग बंगळूरु आणि छत्रपती संभाजीनगरला जोडणार आहे. याशिवाय, हा रस्ता पुणे रिंग रोडशी कनेक्ट केला जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती.
आणखी वाचा
अटल सेतूमुळे 60 टक्के मच्छी कमी झाली, नुकसानभरपाई मागत मच्छिमार संघटनेची हायकोर्टात याचिका