IND vs SA : अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
IND vs SA : तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 20 ओव्हरमध्ये 117 धावा करता आल्या. अर्शदीप सिंगनं या मॅचमध्ये दमदार कमबॅक केलं.

धर्मशाला : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी टी 20 मॅच धर्मशाला येथे सुरु आहे. भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादव यानं टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवचा हा निर्णय अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा या दोघांनी सार्थ ठरवत सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेला धक्के दिले. आफ्रिकेचे फलंदाज यातून शेवटपर्यंत सावरु शकले नाहीत. दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना 117 धावा केल्या. अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. भारताला विजयासाठी आता 118 धावा करायच्या आहेत.
अर्शदीप सिंग आणि हर्षित राणाची दमदार सुरुवात
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. मात्र, तिसऱ्या टी 20 सामन्यात अर्शदीप सिंग आणि हर्षित राणानं दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना फटकेबाजी करु दिली नाही. पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 3 बाद 25 अशी होती. अर्शदीप सिंगनं दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 54 धावा दिल्या होत्या. अर्शदीपनं तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये कमबॅक करत 4 ओव्हरमध्ये 2 विकेट घेत 13 धावा दिल्या
एडन मारक्रम यानं एकट्यानं किल्ला लढवला
भारताच्या गोलंदाजांपुढं दक्षिण आफ्रिकेच्या इतर फलंदाजांना फटकेबाजी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेचे दोन्ही सलामीवर 2 धावांवर तंबूत परतले. रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डीकॉक, डेवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, कॉर्बिन बॉश, मार्को यानसेन या फलंदाजांना दोन अंकी धावसंख्या देखीलल करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडन मारक्रम यानं 61 धावा केल्या. तर, डोनोवेन फेरेइरा यानं 20 धावा केल्या.
भारताकडे मालिकेत आघाडी घेण्याची संधी
भारताच्या गोलंदाजांनी तिसऱ्या टी 20 सामन्यात दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. आता भारताच्या फलंदाजांना दमदार कामगिरी करत मालिकेत विजय मिळवण्याची संधी आहे. भारत या मॅचमध्ये विजय मिळवत 2-1 अशी आघाडी मिळवू शकतो. पहिली टी 20 मॅच भारतानं जिंकली होती. तर, दुसरी टी 20 मॅच दक्षिण आफ्रिकेनं जिंकली होती.
भारताचा संघ : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, कुलदीप यादव, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, एडन मारक्रम (कॅप्टन), डेवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, डोनोवॅन फेरेइरा, मार्को यानसेन, कॉर्बिन बॉश, एनरिक नॉर्तजे, लुंगी एन्गिडी, ओटोनील बार्टमन





















