Uttarakhand New CM: कोण होणार उत्तराखंडचा मुख्यमंत्री? 'या' तारखेला होणार जाहीर
भाजपने (BJP) उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) एक हाती सत्ता मिळवली आहे. यामध्येच राज्याचे मुख्यमंत्री निवडणुकीत पराभूत झाल्याने उत्तराखंडमध्ये भाजपचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Uttarakhand New CM: भाजपने उत्तराखंडमध्ये एक हाती सत्ता मिळवली आहे. यामध्येच राज्याचे मुख्यमंत्री निवडणुकीत पराभूत झाल्याने उत्तराखंडमध्ये भाजपचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच दरम्यान पक्षाने धर्मेंद्र प्रधान आणि पियुष गोयल यांना निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हे दोघेही 19 मार्च रोजी डेहराडूनला जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, होळीच्या दुसऱ्या दिवशी उत्तराखंडमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. पुष्कर सिंह धामी, धनसिंग रावत, सतपाल महाराज, रितू खंडुरी, गणेश जोशी यांच्यासह अनेक नेते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. पुष्कर धामी विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊनही अनेक आमदारांनी धामी यांच्या समर्थनात आपली जागा रिकामी करून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.
दुसऱ्यांदा उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता
उत्तराखंडच्या राजकारणात भाजपने यावेळी पुन्हा सत्तेत येऊन एक नवीन विक्रम बनवला आहे. याआधी कधीही भाजपला सतत दोनदा सत्ता रिपीट करता आली नव्हती. मात्र मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्या पराभवानंतर राज्यातील मुख्यमंत्रीपदाची निवडणूक हरण्याचा विक्रम भाजपला मोडता आला नाही. त्यामुळे वर्षभरात चौथ्यांदा मुख्यमंत्री निवडण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेने अनेक नेत्यांनी दिल्लीत तळ ठोकला आहे. नवीन मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अनेक चेहरे आणि दावेदार आहेत, पण पुष्कर सिंह धामी अजूनही चर्चेत आहेत.
मी माझ्या जबाबदारी पूर्ण केल्या - धामी
केंद्रातील काही बडे नेते पुष्कर धामी पराभूत झाल्यानंतरही यांच्या बाजूने उभे असून त्यांना पुन्हा निवडणूक लढवून मुख्यमंत्री बनवण्यासाठी पाठिंबा देत आहेत. तर यादरम्यान, खुद्द धामीही मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला आहे. पुष्कर सिंह धामी म्हणाले आहेत की, "मी माझ्या विधानसभा मतदारसंघात अधिक वेळ घालू शकलो नाही. उत्तराखंडमध्ये पुन्हा सत्ता आणण्याची जबाबदारी मला देण्यात आली होती. मी कधीही कोणते पद मागितले नाही, माझ्यावर जी जबाबदारी सोपवण्यात आली होती, ती मी पूर्ण केली आहे.''
भाजपसमोर काय आहे आवाहन?
उत्तराखंडमध्ये भाजप नेते स्वतः सांगत आहेत की, एकूण सहा आमदारांनी पुष्कर सिंह धामी यांना आपली जागा सोडून त्यांना त्या जागेवरून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. त्यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी दर्शवण्यात आलेला हा पाठिंबा धामींना नक्कीच दिलासा देणारा आहे. मात्र अंतिम निर्णय केंद्रीय हायकमांड घेणार आहेत. एकाच टर्ममध्ये तीन मुख्यमंत्री बदलणारा भाजप यावेळी असा चेहरा देण्याचा प्रयत्न करेल, जो मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि 2024 च्या निवडणुकीत राज्यातील लोकसभेच्या पाचही जागा जिंकण्याचे लक्ष्यही पूर्ण करू शकेल.
महत्त्वाच्या बातम्या: