ठरलं! उन्मेष पाटील आज ठाकरे गटात प्रवेश करणार, संजय राऊतांची मोठी घोषणा; ठाकरेंचा भाजपला 'दे धक्का'
Sanjay Raut PC : भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील त्यांच्यासोबत पारोळ्याचे नगराध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची मोठी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
मुंबई : भाजप खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) ठाकरे गटात (UBT Shiv Sena) प्रवेश करणार असल्याची मोठी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Uddhav Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. आज दुपारी 12 मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. भाजपसह महायुतीला हा मोठा धक्का मानला जात आहे. जळगावातून दुसऱ्यांदा उमेदवारी न मिळालेले खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात सामील (Unmesh Patil Will Join Shiv Sena) होणार आहे. उन्मेष पाटील यांच्या ठाकरे गटात प्रवेशाची गेले अनेक दिवस चर्चा होती. काल त्यांनी मुंबईत उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांची भेटही घेतली होती.
भाजप खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार
भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील, नगराध्यक्ष करण पवार आणि त्याचे अनेक सहकारी, पदाधिकारी आज मातोश्रीवर 12 वाजता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश करणार आहेत. उन्मेष पाटलांच्या ठाकरे गटात प्रवेशामुळे जळगावची निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. शिवसेनेला हमखास विजयाच्या दिशेने नेणारा आजचा पक्षप्रवेश आहे, असं संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
जळगावातून शिवसेनेचा खासदार लोकसभेवर निवडून जाईल
जळगावचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. पक्षप्रमुख आज किंवा उद्या दोन दिवसात उमेदवार जाहीर करतील. त्यानंतर सर्वांना कळेल की, जळगावची निवडणूक कोण लढणार. उन्मेष पाटलांच्या प्रवेशाने जळगावची शिवसेना मजबूतीने पुढे जाईल. त्यांची ताकद आणि शिवसेनेची ताकद एकत्र येईल आणि जळगावातून शिवसेनेचा खासदार लोकसभेवर निवडून जाईल, यावर शंका नाही, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
गर्जना आणि नारा यामध्ये फरक
भाजपच्या 400 पार च्या नाऱ्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, भाजप आता काही दिवसांनी नारे देण्यासाठीही शिल्लक राहणार नाही. मोदीही अखंड हिंदुस्तानचे नारे देत होते, पाकव्याप्त काश्मीर हिंदुस्तानात आणू, चीनला धडा शिकवू, हे नारे दिले. त्यांच्या नाऱ्यांचा पुस्तक काढलं पाहिजे, गर्जना आणि नारा यामध्ये फरक आहे. वाघाच्या डरकाळ्या आहेत, त्यांचे नारे आहेत. त्यांने नारे देऊ द्यात, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीकास्त्रल डागलं आहे.
तिकीट कापल्याने उन्मेष पाटील नाराज
भाजपने जळगाव मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं. जळगाव मतदारसंघातून भाजपने ऐनवेळी उन्मेष पाटलांचा पत्ता कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर उन्मेष पाटील नाराज असल्याचं समोर आलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :