Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Palash Muchhal: पलाश आणि स्मृती या दोघांच्या सलग पोस्ट्सनंतर त्यांच्या नातेसंबंधातील तणाव आणि लग्न मोडल्याच्या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे.

Palash Muchhal: भारतीय क्रिकेटमधील सर्वाधिक चर्चेत असलेले नाव आणि हजारो तरुणींसाठी प्रेरणादायी असलेल्या स्मृती मानधनाने गेल्या काही आठवड्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सुरु असलेल्या अफवांना अखेर स्वतः तिने पूर्णविराम दिला. “मी खूप खासगी स्वभावाची आहे, पण लग्न रद्द झालं आहे. हा विषय इथंच थांबवावा,” असे सांगत स्मृतीने इन्स्टाग्राम स्टोरीवरून पलाशशी लग्न मोडल्याचं जाहीर केलं. दोन्ही कुटुंबांना आवश्यक ती गोपनीयता आणि या कठीण टप्प्यात मोकळीक मिळावी, अशी विनंती करत पुढे आपलं लक्ष पुन्हा एकदा क्रिकेटमधील ध्येयाकडेच राहील, असं म्हटलं आहे. “भारतासाठी सर्वोच्च स्तरावर खेळणं आणि देशासाठी अधिकाधिक विजेतेपदं जिंकणं हेच माझं ध्येय,” असं सांगत स्मृतीने चर्चांना इथेच पूर्णविराम द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पलाशने कोणाला इशारा दिला?
दरम्यान, स्मृतीच्या पोस्टनंतर पलाश मुच्छलनेही इन्स्टाग्राम स्टोरी टाकून नातेसंबंधातून मागे होण्याचा निर्णय जाहीर केला आणि लग्न रद्द झाल्याची पुष्टी दिली. “कोणताही आधार नसलेल्या अफवांवर लोक इतक्या सहज विश्वास ठेवताना पाहणं फार कठीण होतं. हा माझ्या आयुष्यातला कठीण काळ असूनही मी शांतपणे याला सामोरं जाईन,” असे तो म्हणाला. पलाशने समाजावरही थेट बोट ठेवत, कोणत्याही व्यक्तीबद्दल पडताळणी न करता चर्चा करणारी सवय बदलण्याची गरज अधोरेखित केली. “आपले शब्द कोणाला किती खोल जखम करू शकतात, याची जाणीव आपल्याला नसते,” असा टोला हाणत, पुढे खोटी आणि बदनामी करणारी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात त्याची टीम कडक कायदेशीर कारवाई करणार आहे, असंही त्याने स्पष्ट केलं. त्यामुळे पलाश आणि स्मृती या दोघांच्या सलग पोस्ट्सनंतर त्यांच्या नातेसंबंधातील तणाव आणि लग्न मोडल्याच्या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे.
View this post on Instagram
स्मृतीनं काय म्हटलं आहे आपल्या पोस्टमध्ये?
गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा आणि अफवा पसरत आहेत, म्हणून मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं. मी खूप खाजगी स्वभावाची आहे, पण एक गोष्ट स्पष्ट सांगते की लग्न रद्द झालं आहे. हा विषय इथंच थांबवायला मला आवडेल आणि तुम्ही सगळ्यांनीही तसं करावं, अशी विनंती आहे. सध्या दोन्ही कुटुंबांची गोपनीयता राखावी आणि आम्हाला आमच्या वेगाने हे सगळं समजून घेऊन पुढे जाण्यासाठी थोडी मोकळीक द्यावी. पलाश मुच्छलनेही पोस्ट केली आहे. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठं ध्येय असतं. माझ्यासाठी ते नेहमीच भारतासाठी सर्वोच्च स्तरावर क्रिकेट खेळणं आणि देशासाठी जास्तीत जास्त विजेतेपदं जिंकणं हेच आहे. पुढेही माझं पूर्ण लक्ष याच गोष्टीवर राहणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे.
पलाशने केलेल्या पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?
मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नातेसंबंधातून मागे सरकण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांनी कोणताही आधार नसलेल्या अफवांवर इतक्या सहज विश्वास ठेवून प्रतिक्रिया देताना पाहणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टींबद्दल या अफवा पसरल्या, आणि हा माझ्या आयुष्यातला फार कठीण काळ आहे, पण मी माझ्या मूल्यांवर ठाम राहून शांतपणे याला सामोरं जाईन. आपण समाज म्हणून, कोणाच्याही बदनामीच्या अफवा किंवा न पडताळलेल्या गोष्टी ऐकून त्याचा न्याय करण्याआधी थोडा थांबायला शिकलं पाहिजे, अशी खरी इच्छा आहे. आपले शब्द कोणाला किती खोल जखम करू शकतात, हे आपल्याला कधी कधी समजतही नाही. आपण या गोष्टींबद्दल विचार करत असतानाच, जगात अजून अनेक लोक मोठ्या अडचणींना सामोरं जात आहेत. खोटी आणि बदनामी करणारी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात माझी टीम कडक कायदेशीर कारवाई करणार आहे. या कठीण काळात ज्यांनी माझ्या सोबत उभं राहून माझ्यावर प्रेम आणि आपुलकी दाखवली, त्या सर्वांचे मनापासून आभार.
इतर महत्वाच्या बातम्या























