(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray : अरविंद सावंत, अनिल देसाई 'या' दिवशी अर्ज दाखल करणार, उद्धव ठाकरे मुंबईत शक्तीप्रदर्शन करणार
Shivsena UBT : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मुंबईतील चार जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यापैकी मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्यचे उमेदवार 29 एप्रिलला अर्ज दाखल करणार आहेत.
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या महाविकास आघाडीत आहे. महाविकास आघाडीत ठाकरेंची शिवसेना 21 जागांवर निवडणूक लढवत आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदरसंघांपैकी चार लोकसभा मतदारसंघांमध्ये ठाकरेंची शिवसेना निवडणूक लढवत आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम आणि ईशान्य मुंबईत ठाकरेंनी उमेदवार दिले आहेत. यापैकी दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईची जागा ठाकरेंसाठी महत्त्वाची आहे. या ठिकाणी त्यांचे विश्वासू सहकारी दक्षिण मुंबईचे विद्यमान खासदार अरविंद सावंत रिंगणात आहेत. दुसरीकडे दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोन्ही उमेदवारांचे अर्ज 29 एप्रिल रोजी भरण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे पक्षाकडून देण्यात आली आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन्ही उमेदवार 29 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई ओल्ड कस्टम हाऊस येथे 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोर्ट येथील पुतळ्याजवळ जमन्याचे आवाहन शिवसैनिकांना करण्यात आलं आहे.
शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ जमन्याचे आदेश देण्यात आले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यापासून ओल्ड कस्टम हाऊस इथपर्यंत ठाकरे गट शक्तीप्रदर्शन करत दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.
ठाकरेंचे चार शिलेदार मुंबईतून लढणार
महाविकास आघाडीच्या जागावाटपात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 21 जागा मिळाल्या. यामध्ये मुंबईतील चार मतदारसंघांचा समावेश आहे. दक्षिण मुंबईत अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई, उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर आणि ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई यांच्या विरोधात राहुल शेवाळे यांचं आव्हान आहे. ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांच्या विरोधात भाजपचे मिहीर कोटेचा यांचं आव्हान आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात उमेदवार महायुतीकडून अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.
संबंधित बातम्या
Uddhav Thackeray : वर्षाताईंना खासदार करुन दिल्ली पाठवणार, उद्धव ठाकरेंचा शब्द