(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dindori Lok Sabha : आता माघार नाहीच! माकपच्या जे पी गावितांनी भरला उमेदवारी अर्ज, दिंडोरीत महाविकास आघाडीत बिघाडी
Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी आज माकपचे जे पी गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येते.
Dindori Lok Sabha Constituency : गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी लोकसभा मतदारसंघ राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे. दिंडोरीची जागा माकपला सोडावी, अशी मागणी माकपने केली होती. मात्र महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाच्या वाट्याला आली. राष्ट्रवादी शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar Faction) दिंडोरी लोकसभेसाठी भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र भास्कर भगरे हे उमेदवार बदलावेत, अन्यथा त्यांना पडणारच, असा इशारा जे पी गावित (J P Gavit) यांनी शरद पवारांना दिला होता.
त्यानंतर आज माजी आमदार जे पी गावित यांनी दिंडोरी लोकसभेसाठी (Dindori Lok Sabha Constituency) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे दिंडोरीत महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे. नुकतीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant patil) यांनी जे पी गावित यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जे पी गावित हे आपल्या मागणीवर ठाम राहिलेत आणि अखेर त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
आता काही झालं तरी माघार घेणार नाही
यावेळी जे पी गावित म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे उमेदवारी करत आहोत. आमची उमेदवारी इंडिया आघाडीकडून आहे, आम्ही माघार घेणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवाराची माघार घ्यावी. आम्ही किती दिवस इतरांच्या पालख्या व्हायच्या. राज्यभरात आमचे 10 लाख मतदार आहेत. ते आघाडीला मतदान करतील. दिंडोरीची जागा माकपला सोडावी. राष्ट्रवादी काँग्रेसने इतर नऊ जागांवर लक्ष द्यावे, ही जागा आम्हीच लढविणार. आता काही झाले तरी माघार घेणार नाही, आम्हाला विजयाची खात्री आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
लाल वादळ पुन्हा नाशिकच्या रस्त्यावर
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाशिकच्या रस्त्यावर पुन्हा एकदा लाल वादळ परतले. मात्र यावेळी कुठल्याही मोर्चा आंदोलनासाठी नाही तर माजी आमदार जे पी गावीत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लाल वादळ नाशिकमध्ये दाखल झाले. ज्या रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले होते. त्याच ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी माकप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आणखी वाचा