(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray : वर्षाताईंना खासदार करुन दिल्ली पाठवणार, उद्धव ठाकरेंचा शब्द
Uddhav Thackeray : काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील आणि कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना एबी फॉर्म दिले. वर्षाताईंना खासदार करुन दिल्लीला पाठवणार आहे. देशात हुकूमशाही येऊ नये, राज्यघटना बदलू नये यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी लढतेय आणि जिंकणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
वर्षाताई गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. त्यामुळं त्या कुठूनही लढू शकतात आणि जिंकू शकतात. महायुतीबरोबर आम्ही आघाडी केलेली नाही, त्यामुळं त्यांच्या उमेदवाराचं काही सांगू शकत नाही, असं ठाकरे म्हणाले.घोसाळकरांसह सगळे जागेवर आहेत, असंही त्यांनी म्हटलं.
माझं मत वर्षाताईंना : उद्धव ठाकरे
गेल्या 10 महिन्यांपासून या मतदारसंघात राहत आहे. त्यामुळं हा मतदारसंघ नवा नाही, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. मुंबईतील सहाच्या सहा जागा महाविकास आघाडीच्या निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 2004 ची पुनरावृत्ती होईल, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं. यावर उद्धव ठाकरे यांनी वर्षाताई एक मिनिट माझं मत तुला मिळणारे, असं म्हटलं. मी तिचा मतदार आहे, असं ठाकरे म्हणाले.
पंजाला पहिल्यांदा मतदान करत असलो तरी त्या हातामध्ये मशाल आहे. त्याचा एकत्रित परिणाम होईल त्यावेळी तुतारी फुंकणार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 70 हजार कोटींचा घोटाळा, शिखर बँक घोटाळ्याबाबत तुम्ही आरोप करत होतात. ते लोक तुमच्याकडे आल्यानंतर त्यांना क्लीन चीट कशा मिळाल्या, असं लोकं विचारतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना ईओडब्ल्यूनं क्लीन चीट दिली होती, त्याचा तपशील दोन दिवसांपूर्वी समोर आला होता, त्याचा संदर्भ घेत उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस आणि अजित पवारांवर नाव न घेता टीका केली. नाना पटोले म्हणतात तसं, काही लोक चावीचं खेळणं आहेत, जशी चावी दिली जाईल तसं खेळतात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केली.
सांगली लोकसभा मतदारसंघासंदर्भात विचारलं असता उद्धव ठाकरे यांनी सांगली आमची चांगली असल्याचं म्हटलं. सांगलीतून शिवसेनेचे चंद्रहार पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर भाजपच्या संजयकाका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचं आव्हान आहे.
संबंधित बातम्या :
नाशिकमध्ये नवा ट्विस्ट, ना भुजबळ, ना गोडसे; दोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच उमेदवारीचा लाभ !