(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
Uddhav Thackeray: मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडणार आहेत. या बैठकीत शिवसेना युबीटी पक्षाच्या गटनेते, प्रतोद संदर्भात निर्णय अपेक्षित आहेत.
मुंबई : राज्यातील विधानसभेच्या निकालाने महाविकास आघाडीचं पाणीपतं झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, राज्यात भाजप महायुतील तब्बल 236 जागांवर स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने तब्बल 132 जागांवर विजय मिळवला आहे. तर, शिवसेना शिंदे गटानेही तब्बल 57 जागांवर विजय मिळवला असून गत कार्यकाळात शिवसेनेत (Shivsena) झालेल्या बंडानंतर जेवढे आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले होते, त्यापेक्षा जास्त आमदार आता विजयी झाले आहेत. तर, शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे 20 आमदार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्याचं दिसून येत आहे. मात्र, सत्तास्थापनेपूर्वीच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली असून आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतले जाणार असल्याची माहिती आहे. गतवेळी झालेल्या शिवसेनेतील बंडातून मोठा धडा घेत ठाकरेंकडून ही खबरदारी घेतली जात असल्याचे दिसून येते,
मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडणार आहेत. या बैठकीत शिवसेना युबीटी पक्षाच्या गटनेते, प्रतोद संदर्भात आज निर्णय अपेक्षित आहेत. त्यामध्ये, नवनिर्वाचित आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतलं जाणार असल्याचे समजते. नवनिर्वाचित 20 आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार असून पक्षामध्ये पक्षप्रमुखांचा निर्णय हा अंतिम राहणार, पक्षाने घेतलेल्या निर्णयाशी सर्व आमदार बांधिल असतील, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र सर्व नवनिर्वाचित आमदारांकडून लिहून घेतले जाणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेचा मागील पक्ष फुटीचा अनुभव पाहता, ठाकरेंच्या शिवसेनेकडून विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याचे दिसून येते. शिवसेना पक्षाचे गटनेते आणि प्रतोद निवडण्यासंदर्भात सुद्धा आज निर्णय घेतला जाणार असून उद्धव ठाकरेंकडून काही सूचना सुद्धा नव्या आमदारांना दिल्या जाणार आहेत.
शिवसेना गटनेतेपदी कोण?
कोकणातील शिवसेनेचे नेते भास्कर जाधव, आदित्य ठाकरे सुनील प्रभू या नेत्यांचा विचार प्रपोज आणि गटनेते पदासाठी केला जाणार असल्याची चर्चा शिवसेनेच्या राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. शिवसेनेच्या आजच्य बैठकीत विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालासंदर्भात सुद्धा चर्चा या नव्या आमदारांसोबत आणि ठाकरे गटांच्या नेत्यांसोबत केली जाणार आहे.
राज्यातील संख्याबळ, कोणत्या पक्षाला किती जागा
महायुती- 236
मविआ- 49
इतर- 3
---------------------
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
अपक्ष- 2