(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उद्धव ठाकरेंकडून सांगलीचा उमेदवार परस्पर जाहीर, महाराष्ट्रातील 3 जागांचा तिढा दिल्ली दरबारी
Sangli : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (दि.21) सांगलीत सभा पार पडली.
Sangli : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (दि.21) सांगलीत सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगलीचा उमेदवार जाहीर केला. त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सांगलीची जागा परस्पर जाहीर केल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांची पुन्हा नाराजी पसरली आहे. दिवसभरात तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सात तास चर्चा करूनही महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटला नाही त्यात ठाकरेंनी (Uddhav Thackeray) परस्पर उमेदवार घोषित केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वाद चिघळण्याची चिन्ह आहेत.
सांगली, भिवंडी आणि मुंबईतील एका जागेचा तिढा दिल्ली दरबारी पोहोचला
महाविकास आघाडी गेल्या आठवड्यांपासून जागावाटपावर चर्चा करताना दिसत आहे. मात्र, अद्याप अनेक जागांवर तिनही पक्षांचे एकमत झालेले नाही. सांगली, भिवंडी आणि मुंबईतील एका जागेवरुन काँग्रेस नेते आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये मतभेद झाले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. दरम्यान, आता ठाकरे गटाने सांगलीचा उमेदवार जाहीर केल्यानंतर दोन्ही पक्षातील वाद वाढणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शिवसेना, राष्ट्रवादीच्या जागांची मागणी राज्यातील काँग्रेस नेत्यांना मान्य नाही
काँग्रेसकडे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ज्या जागा मागितल्या आहेत. त्या जागा सोडण्यासाठी काँग्रेस नेत्यांची तयारी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जागा वाटपावरुन महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरुच आहे. महायुती प्रमाणेच महाविकासआघाडीतही जागावाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
कोल्हापुरात शिवसेनेचा खासदार असतानाही काँग्रेसचा उमेदवार
कोल्हापूर लोकसभेसाठी 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे तसं पाहिले तर शिवसेना या जागेवर दावा करु शकत होती. मात्र, या जागेवर काँग्रेसने शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसने घेतल्याने ठाकरे गट सांगलीची जागा लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भिवंडी आणि मुंबईतील जागांवर ठाकरे गटाने किंवा काँग्रेस पक्षाने अद्याप कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे अद्याप या जागांचा तिढा सुटलेला नाही. मात्र, भिवंडीची जागा कोणाला सुटणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या