Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अॅक्शन मोडवर
Bopdev Ghat Incident : पुण्यातील बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. 10 लाखांचं बक्षीस जाहीर केल्यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस 'सिंबा'ची मदत घेणार आहे.
पुणे : येथील बोपदेव घाटात (Bopdev Ghat) गुरुवारी आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तीन जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी (Police) घटनेचा सखोल तपास सुरू केला असून पोलिसांनी आतापर्यंत 200 हून अधिक संशयित व्यक्तींची कसून चौकशी केली आहे. आता बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी "सिंबा"ची (SIMBA) मदत घेण्यात येणार आहे.
बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील (Bopdev Ghat Rape case) आरोपींना पकडण्यासाठी राज्य सरकार आणि गृह मंत्रालयाने मोठे पाऊल उचलले आहे. आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीला 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा पोलीस खात्याकडून (Pune Police) करण्यात आली आहे. आरोपींची नावे आणि ठावठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीची ओळखही गुप्त ठेवली जाईल, असे आश्वासनही पोलिसांनी दिले आहे.
आरोपींचा शोध घेण्यासाठी 'सिंबा'ची मदत
यानंतर आता बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी सिस्टीम फॉर इंटेलिजंट मॉनिटरिंग बिहेवियरियल एनालिसिस (SIMBA) या एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. एआय मॉडेलची मदत घेऊन माहिती संकलित केली जाणार आहे. रात्रीची वेळ असल्याने सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत नसल्याने संशयित आरोपींचे चेहरे पाहण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. SIMBA चा मुख्य घटक, क्राइम GPT म्हणून ओळखला जातो. तो व्हिडिओ, इमेज आणि ऑडिओमधून माहिती काढण्यासाठी विस्तृत डेटाबेस वापरतो. "सिंबा" हे तंत्रज्ञान 1.5 लाख गुन्हेगारी नोंदी असलेल्या डिजिटल डेटाबेसशी जोडले गेले आहे.
नेमकं प्रकरण काय?
पीडित तरुणी पुण्यातील बोपदेव घाटात गुरुवारी रात्री आपल्या मित्रासोबत फिरायला गेली होती. यावेळी तीन जणांनी या दोघांवर हल्ला केला. हल्लेखोरांनी तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवला. आरोपींनी तरुणाला मारहाण करून त्याचा शर्ट काढला आणि त्याच शर्टने आरोपींनी तरुणाचे हात बांधले. त्याच्याच पॅन्टचा पट्टा काढून त्याचे पाय देखील बांधले. त्यानंतर आरोपींनी तरुणाला एका झाडाला बांधून ठेवले. त्यांनतर 21 वर्षीय तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. नराधम आरोपींकडे कोयता, चाकू अशी शस्त्रे होती, तसेच एका आरोपीच्या हातात बांबू होता. मित्राला ठार मारण्याची धमकी देऊन आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती समोर येत आहे.
आणखी वाचा