Jalna News : जालन्यात काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना राडा, दोन गटात जोरदार घोषणाबाजी
Maharashtra Assembly Election 2024 : जालना येथे काँग्रेसच्या विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान दोन गटात जोरदार राडा झाला.
जालना : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार असून सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेसाठी कंबर कसली आहे. सध्या विविध पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहे. त्यातच आता जालना येथे काँग्रेसच्या (Congress) विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान दोन गटात राडा झाल्याची माहिती मिळत आहे.
जालना (Jalna News) येथे काँग्रेसच्या विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. यावेळी दोन गटांमध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळालं. काँग्रेसचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) आणि काँग्रेस नेते अब्दुल हाफिज (Abdul Hafiz) यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची होऊन जोरदार घोषणाबाजी झाली. निवडणूक निरीक्षक खासदार डॉ. शोभा बच्छाव (Shobha Bachhav) यांच्या यांच्यासमोरच काँग्रेस समर्थकांचा हा गोंधळ पाहायला मिळाला.
काय म्हणाले कैलास गोरंट्याल?
दरम्यान, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी ही घटना शुल्लक असल्याचे भासवत समर्थकांकडून जिंदाबाद मुर्दाबादच्या घोषणा झाल्याचे म्हटले. याशिवाय कोण अब्दुल हाफिज? असा सवाल करत आपला राग देखील व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राहुल गांधी, नाना पटोलेंकडे तक्रार करणार : अब्दुल हाफिज
तर, काँग्रेसचे नेते अब्दुल हाफिज यांनी कैलास गोरंट्याल यांच्या समर्थकांनी स्टेजवरून ढकलण्याचा प्रयत्न करत विरोधात घोषणाबाजी केल्याचा आरोप केलाय. दरम्यान या प्रकरणी आपण काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या राड्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे.
अहमदनगरमध्येही काँग्रेसमध्ये गटबाजी
तीन दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात (Shrirampur Assembly Constituency) काँग्रेसच्या विधानसभा निहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू होत्या. या मुलाखती सुरु असताना दोन्ही गटात गोंधळ उडाला. यामुळे काँग्रेस पक्षाची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांचा धिक्कार करत काँग्रेसच्या दुसऱ्या गटाकडून घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसचे पक्ष निरीक्षक आ. मुज्जफर हुसेन यांच्यासमोर काँग्रेसच्या दोन गटात गोंधळ उडाला. काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांच्याविरोधात काँग्रेसचे इच्छुक उमेदवार हेमंत ओगले यांच्या गटाकडून शक्तीप्रदर्शन करत घोषणाबाजी करण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आणखी वाचा