(Source: ECI/ABP News/ABP Majha)
झिरवळांचा राज ठाकरेंवर पलटलवार; धनगड दाखल्यावरुन मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार
नरहरी झिरवाळ यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांना प्रत्यक्षपणे चॅलेंजच दिलंय. मी जाळी नसलेल्या ठिकाणी सुद्धा उडी मारू शकतो, मी आदिवासी आहे
मुंबई : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गेल्या वर्षभरापासून पेटला असतानाच, आता आदिवासी व धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा तापत असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari zirwal) यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नावरुन व आरक्षणाच्याच्या मुद्द्यावर चक्क मंत्रालयातील जाळीवर उड्या घेतल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. चक्क विधानसभा उपाध्यक्षांनाच न्याय मागण्यांसाठी जाळीवर उड्या घ्यावा लागत असतील, तर सर्वसामान्यांचं काय असा सवाल उपस्थित करत अनेकांनी झिरवाळ यांना व सत्ताधाऱ्यांना ट्रोल केलं. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही ट्विटरवर पोस्ट करत झिरवाळ यांना चांगलंच सुनावलं होतं. तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?, असे म्हणत जाळी नसलेल्या इमारतीवरुन उडी घेण्याचा सल्ला देखील दिला होता. आता, त्यावरुन नरहरी झिरवाळ यांनी पलटवार केला आहे.
नरहरी झिरवाळ यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांना प्रत्यक्षपणे चॅलेंजच दिलंय. मी जाळी नसलेल्या ठिकाणी सुद्धा उडी मारू शकतो, मी आदिवासी आहे. जाळीवर उडी मारणाऱ्यांना कोणी सर्कस म्हणो किंवा तमाशा म्हणो पण माझ्या आदिवासी बांधवांना न्याय मिळाला, असा पलटवार नरहरी झिरवाळ यांनी राज ठाकरेंच्या टीकेवर केला आहे. तसेच, ज्यांना प्रयोग करायचा असेल त्यांनी अजून डबल जाळी लावून उडी मारावी, असा खोचटा टोलाही नाव न घेता राज ठाकरेंना लगावला.
काय म्हणाले होते राज ठाकरे
सत्तेशिवाय राहू शकत नाही, असं म्हणणं शक्य नव्हतं, म्हणून 'जनतेच्या सेवेला सत्ता हवी', म्हणत तुम्हीच आणि तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्यात ना? सत्ता आली तरी तुम्ही स्वतःचं सोडून कोणाचंही भलं करू शकत नाही हे नक्की. बरं मुळात तुम्ही सत्ताधारी, त्यात पुन्हा संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय? आदिवासी जनतेबद्दल खरंच कळवळा असेल तर, आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी, ज्यांनी आदिवासी हे मागासच राहतील हे पाहिलं त्या सगळ्यांनी संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, अशा शब्दात मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या मारणाऱ्या निषेध आंदोलानावर राज ठाकरे यांनी भाष्य केलंय.
मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन जाब विचारणार
राज्य सरकारने धनगड नावाने काढण्यात आलेले जातीचे दाखले रद्द केले आहेत. धनगर समाजाकडून या निर्णयाचं स्वागत होत आहे. सरकारच्या या निर्णयाला आव्हान देणार असल्याचं नरहरी झिरवळ यांनी म्हटलंय. त्यामुळे, राष्ट्रवादी सत्तेत असलेल्या महायुती सरकारला नरहरी झिरवाळ यांचा घरचा आहेर आहे. तसेच, आमच्यातील बोगस दाखले देखील रद्द करा, आमची मागणी होती. तेव्हा मात्र सरकारने हे आमच्या अधिकारात नसल्याचं सांगत हात झटकले. मग आता सरकारने हा निर्णय कसा घेतला?, असा सवाल केला आहे. तर, याबाबत उद्याच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि जाब विचारणार असल्याचंही झिरवाळ यांनी म्हटलं.
माझी हिंमत होत नाही -
मी शरद पवारांच्या संपर्कात असण्याचं कोणीही सांगणार नाही. ज्या दिवसापासून मी पवार साहेबांपासून बाजूला आलो, त्यानंतर मी त्यांच्यासमोर गेलो नाही. त्यांच्यासमोर जाण्याची माझी हिंमत होत नाही, शेवटी त्यांच्यासमोर जाताना खूप प्रगल्भता असावी लागते, ती माझ्यात नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात जाण्याच्या चर्चेला झिरवाळ यांनी पूर्णविराम दिलाय.
हेही वाचा
हायकोर्टाचा आदेश पाळला; पोस्टात वाजत गाजत जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाख रुपयांचा DD पाठवला