Shiv Sena : नाशिकच्या शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण, शिवसैनिक संभ्रमात; एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार?
Shiv Sena : शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे आणि उपनेते अजय बोरस्ते यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुप्त संघर्ष सुरु असल्याची चर्चा आहे.
Shiv Sena : काही दिवसांपूर्वी अयोध्येतील राम मंदिराच्या स्थापनेच्या वर्षपूर्तीबाबत देण्यात आलेल्या नाशिकमधील जाहिरातीच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटातील (Shiv Sena Shinde Faction) गटबाजी उघड दिसून आली होती. आता वरिष्ठ पातळीवर गटबाजीची तक्रार गेल्यानं पक्ष संघटनेत फेरबदल होणार आहेत. पुढील दहा ते पंधरा दिवसात शिवसेनेची कार्यकारणी बरखास्त होण्याच्या मार्गावर आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून काही दिवसांपूर्वी काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत देण्यात आलेल्या जाहिरातीत शिवसेनेचे उपनेते आणि जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांचे नाव टाकण्यात आले नाही. इतर सर्व महत्वाच्या नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे नाव असताना अजय बोरस्ते यांचे नाव वगळल्याचे पाहायला मिळाले. शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे (Pravin Tidme) आणि उपनेते अजय बोरस्ते यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुप्त संघर्ष सुरु असल्याची पक्षात चर्चा आहे.
गटबाजीच्या माध्यमातून बालिशपणा : अजय बोरस्ते
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात मोठं इनकमिंग सुरु आहे. मात्र एकीकडे पक्षात इनकमिंग सुरु असतानाच पक्षातील गटबाजीमुळे शिवसैनिक संभ्रमात आहेत. महानगर प्रमुख प्रवीण तिदमे आणि जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्यात गटबाजी सुरु आहे. इतर पक्षातून इनकमिंग करण्यासाठी दोन्ही गटात स्पर्धा लागली आहे. तर, गटबाजीच्या माध्यमातून पक्षात बालिशपणा सुरू असल्याचा आरोप अजय बोरस्ते यांनी केला आहे.
शिंदे गटाची कार्यकारणी बरखास्त होणार
दरम्यान, कुणाच्या गटात जावं या संभ्रमामुळे पक्षातील काही मोठे प्रवेश रखडल्याची चर्चा देखील नाशिकमध्ये रंगली आहे. आता या गटबाजीची वरिष्ठ पातळीवर तक्रार गेल्याने पक्ष संघटनेत फेरबदल होणार आहेत. शिवसेना शिंदे गटाची कार्यकारणी बरखास्त होणार आहे. पुढील दहा ते पंधरा दिवसात हा निर्णय होण्याची शक्यता आहे.
मनसेतही गटबाजी उफाळली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत देखील नाशिकमध्ये गटबाजी उफाळल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक दौरा केला होती. पक्षातील अंतर्गत नाराजी, कुरघोडी, गटबाजी करणाऱ्यांना राज ठाकरे यांनी समज दिली होती. यानंतर नाशिकसह अनेक ठिकाणी मनसेच्या पक्ष संघटनेची पुनर्बांधणी करण्यासंदर्भात पक्षात हालचाली सुरु आहेत. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत देखील फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा