Maharashtra Government Collapse: मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याला संजय राऊत जबाबदार, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Government Collapse: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि संजय राऊत हे जबाबदार असल्याची प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे.
Maharashtra Government Collapse: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर बंडखोर गटातील आमदार आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि संजय राऊत हे जबाबदार असल्याचं ते म्हणाले आहेत. एबीपी माझाशी फोनवरून संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
दीपक केसरकर म्हणाले आहेत की, हा राजीनामा आमच्यासाठी आनंदाची गोष्ट नाही. ही आमच्यासाठी दुःखाची गोष्ट आहे. जो संघर्ष आम्हाला करावा लागला याला पूर्णपणे जबाबदार काँग्रेस, राष्ट्रवादी आहे आणि त्यापेक्षा जास्त जबाबदार हे संजय राऊत आहेत. रोज उठायचं आणि काहीतरी टीका करायची. असं करून त्यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये एक दुरी निर्माण केली. ज्याचा परिणाम महाराष्ट्राच्या विकासावर झाला.
केसरकर पुढे म्हणाले की, ''त्यांच्या (उद्धव ठाकरे यांच्यासोबत) बरोबर जे पक्ष होते, ते आमच्या मतदारसंघात जात होते. तिथे उमेदवार देऊन निधी देऊन शिवसेनेला संपवण्याच्या गोष्टी करत होते. हे फक्त आमदारांच्या बद्दलच नाही तर खासदारांच्या बाबतीतही घडत होते. आम्ही वेळोवेळी हे उद्धव ठाकरे यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र इतकी दरी वाढत गेली की, आम्ही त्यांना काय सांगतो, यापेक्षा शरद पवार काय सांगतात, यांचं त्यांना महत्व वाटत होतं. पवार मोठे नेते आहेत. त्यांचा एक पक्ष आहे. ते आपला पक्ष (शिवसेना) का वाढवतील, ते त्यांचा पक्ष वाढवतील. हे लक्षात आलं नाही म्हणून हा परिणाम झाला.''
ठाकरेंना शिवसैनिक जवळचे की शरद पवार: दीपक केसरकर
ते म्हणाले, ''उद्धव ठाकरे यांनी पाहिलं जे भावनिक आव्हान केलं होतं की, कोणत्याही आमदारांनी येऊन सांगावं मी राजीनामा देतो. एकतरी आमदार त्यांचा राजीनामा मागायला आला का? पण शरद पवार आले. यानंतर लगेच त्यांनी सर्व बदल आणि कायद्याची लढाई सुरू केली. आम्हाला अपात्र घोषित केलं. हे कोण सहन करणार, असं चालत का? शिवसैनिक जवळचे की शरद पवार? हा विचार कधीतरी केला पाहिजे.''