Sandeep Deshpande: नरेस, परेस, सुदेसला मोर्चाची परवानगी अन् मराठी लोकांना नाही; मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा निघणारच, संदीप देशपांडेंची माहिती
Sandeep Deshpande: पोलिसांनी आमच्या पक्षाच्या नेत्यांना ताब्यात घेतलं असलं तरी, मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.

Sandeep Deshpande मुंबई: मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यांवर मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चाची (MNS-Shivsena UBT Morcha) हाक दिलीय. आज सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेल ते मीरारोड स्टेशनपर्यंत हा मोर्चा निघणार आहे. मात्र पोलिसांनी या मोर्चाआधी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा जारी केल्या आहेत. काल रात्री साडेतीन वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना ताब्यात घेतलं. तर वसई विरारमधीलही अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र कारवाई झाली तरी मोर्चा निघणारच असा ठाम पवित्रा मनसेने घेतला आहे. पोलिसांनी आमच्या पक्षाच्या नेत्यांना ताब्यात घेतलं असलं तरी, मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिली.
आमच्या पक्षाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तरीही मीरा भाईंदरमध्ये आज मराठी मोर्चा निघणारच...सामान्य माणूस आजच्या मोर्चाचं नेतृत्व करेल, अशी माहिती देखील संदीप देशपांडे यांनी दिली. बिहार निवडणुकांसाठी महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोपही संदीप देशपांडे यांनी भाजपवर केला. मीरा-भाईंदरमधील गुजराती व्यापाऱ्यांना मोर्च्याची परवानगी दिली, मग आम्हाला का नाही?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.
नरेस, परेस, सुदेस...यांना मोर्चा काढण्याची परवानगी-
महाराष्ट्रात नेमकं सरकार कोणाचं आहे, महाराष्ट्राचं आहे की गुजरातचं आहे?, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली. महाराष्ट्रात मराठी लोकांना मोर्चा काढण्याची परवानगी नाही, परंतु गुरजाती लोकांना महाराष्ट्रात मोर्चा काढण्याची परवानगी मिळते, ही भाजपची दडपशाही आहे. नरेस, परेस, सुदेस...यांना मोर्चा काढण्याची परवानगी द्यायची आणि मराठी लोकांना परवानगी द्यायची नाही, याचे सरकारला परिणाम भोगावे लागतील, असा घणाघात संदीप देशपांडेंनी केला.
मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात-
आज मीरा रोडमध्ये होत असलेल्या मराठी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वसई विरारमधील बऱ्याच मनसे पदाधिकाऱ्यांना पहाटे तीन वाजता घरातून, उचलून विविध पोलीस ठाण्यात बसवण्यात आलं आहे. नालासोपारा पोलीस ठाणे, विरार पोलीस ठाणे, नायगांव पोलीस ठाणे, वालीव पोलीस ठाणे इत्यादी ठिकाणी त्यांना ठेवण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील. माजी नगरसेवक आणि शहर सचीव प्रफुल्ल पाटील, वसई शहर संघटक राकेश वैती, शहर अध्यक्ष प्रवीण भोईर, विरार शहराध्यक्ष विनोद मोरे, नालासोपारा उपशहरअध्यक्ष संजय मेहरा , नालासोपारा विभागध्यक्ष दिलीप नेवाळे, कल्पेश रायकर, वाहतूक सेना अध्यक्ष पांडुरंग लोखंडे यांच्यासह अनेकांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.
























