Ram Satpute : यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
Solapur Lok Sabha Election : महायुतीचे सर्व घटक पक्ष भाजपसोबत ताकदीने उभे आहेत. कर्मठ कार्यकर्त्यांच्या जीवावर महायुती सोलापूरचा गड जास्त मताधिक्याने जिंकेल असा विश्वास भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी व्यक्त केला.
सोलापूर : काँग्रेसची सत्ता असताना यांनीच भगवा दहशतवाद हा शब्द आणला, हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत हे वीट आणणारं असल्याची टीका भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांनी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यावर केली. काँग्रेसच्या 70 वर्षांच्या तुलनेत भाजपच्या 10 वर्षात काय झालं हे आम्ही सांगू, ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवू असंही ते म्हणाले.
राम सातपुते म्हणाले की, आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलू, सोलापूरच्या युवकाला हाताला काम भेटल पाहिजे, आयटी पार्क झालं पाहिजे, उद्योग आले पाहिजे, टेक्सटाईल पार्क झाले पाहिजेत. सोलापुरात मोठ्या प्रमाणात सोलापूरला जोडणारे 40 हजार कोटींचे रस्ते आमच्या सरकारच्या काळात झाले. काँग्रेसने मागच्या 70 वर्षात कांहीच दिले नाही. त्यामुळं आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलूया, मी विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे आणि हेच माझं त्यांना उत्तर आहे.
मी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचा आमदार आहे. मी विकासाच्या मुद्द्यावर बोलेन असं राम सातपुते म्हणाले. ते म्हणाले की, ते भिडायचं म्हणत आहेत. मी अतिशय विनम्रतेने त्यांना सांगतो की, 70 वर्षात काँग्रेसने काय केलं आणि 10 वर्षात भाजपने काय केलं याचा आम्ही हिशोब देतो. मागच्या 10 वर्षामध्ये भाजपने सोलापूरचा मोठ्या प्रमाणात विकास केला आहे.
यांनी हिंदूंना टार्गेट केलं
सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्या मंदिर भेटीवरून राम सातपुते यांनी खोचक टीका केली. ते म्हणाले की, मंदिराना विरोधकांनी भेटी देणं हे सॉफ्ट हिंदुत्व नसून डिसगस्टिंग प्रकार आहे. मुळात हिंदूंना दहशतवादी यांनीच म्हटले होते. हे गृहमंत्री असताना त्यांनी जी अॅक्टिव्हिटी राबवली ती हिंदूंना टार्गेट करण्याची होती. मी आता विकासाच्याच मुद्द्यावर बोलणार आहे. 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी'.
राम सापपुते म्हणाले की, हिंदूंना दहशतवादी आणि भगवा आतंकवाद म्हणणं हा यांचा खरा चेहरा आहे. भगवा दहशतवाद म्हणणारे हेच लोक आता भगवे वस्त्र परिधान करणाऱ्या आमच्या संतांचे दर्शन घेत आहेत. पण इथले हिंदू त्यांचा खरा चेहरा जाणून आहेत. त्यामुळे आगामी काळात इथला हिंदू पूर्णपणे ताकदीने आमच्या सोबत आहे.
आम्ही 10 वर्षांचा हिशोब देतो
सोलापुरातील काँग्रेसने जे काही केलं त्याची तुलना आमच्या विकासकामांसोबत करावी. राम सातपुते इथे उमेदवार नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत. त्यामुळे सोलापूरची जनता मोदींच्या विकासकामावर विश्वास ठेऊन मतदान करेल.ही निवडणूक विकासाची, सोलापूरच्या भविष्याची आहे. सोलापूरची जनता सुशीलकुमार शिंदेंना विचारत आहे की, संपूर्ण राजकीय कारकिर्दीत तुम्ही काय केले? मोदींनी काय केलं याचा हिशोब आम्ही देतो. तुमचं आडनाव शिंदे आहे म्हणून तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे.
प्रणिती शिंदेंच्या मतदारसंघात भाजपला लीड
ज्या मतदारसंघात प्रणिती शिंदे आमदार आहेत तिथून देखील भाजपला लीड आहे असं सांगत राम सातपुते म्हणाले की, तुम्ही वारसा चालवता आणि अनुकंपा तत्वावर तुम्हाला तिकीट मिळाले आहे. 2014 ला 48 हजार लीड आणि 2019 च्या लोकसभेला 37 हजाराची लीड प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघात भाजपला मिळालं आहे. सोलापूर शहर मध्य मधील जनता यांना कंटाळली आहे. विरोधक हे फार धनाड्य आणि मोठे लोक आहेत. मी सामान्य परिवारातून आलेला कार्यकर्ता आहे. मी त्यांना नाही भिडू शकत नाही. आम्हाला भिडायचं नाही तर सोलापूरचा विकास करायचं आहे. रोधक हे माजी मुख्यमंत्र्याच्या परिवारातील आहेत, त्यामुळे मी भिडणार नाही. सोलापूरच्या युवकाला काम मिळालं पाहिजे यासाठी मी जीवाचं रान करेन, प्रसंगी खासदारकी पणाला लावेन.
ही बातमी वाचा: