![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Praniti Shinde : प्रणिती शिंदेंना बळ देणारी बातमी! लोकसभेचं पारडं झुकणार? माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित
Solapur Lok Sabha Election : दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप मोहिते हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून त्यामुळे काँग्रेसची ताकद वाढणार हे स्पष्ट झालंय.
![Praniti Shinde : प्रणिती शिंदेंना बळ देणारी बातमी! लोकसभेचं पारडं झुकणार? माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित Solapur MLA Dilip Mohite to join Congress praniti shinde vs BJP Ram Satpute lok sabha election maharashtra politics marathi news Praniti Shinde : प्रणिती शिंदेंना बळ देणारी बातमी! लोकसभेचं पारडं झुकणार? माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/14/6ae2bb4dc3675ab08a509d0d1132cafb1710395206802737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोलापूर : काँग्रेसच्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या विरोधात भाजपने राम सातपुते (Ram Satpute) यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्याचवेळी काँग्रेससाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली असून माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) हे काँग्रेसमध्ये परत येणार आहेत. 31 मार्च रोजी मुंबईत टिळक भवनामध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार असून त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
दिलीप माने हे दक्षिण सोलापूर मतदारसंघांचे माजी आमदार आहेत. 2019 साली त्यांनी शिवसेनेकडून प्रणिती शिंदेच्या विरोधात निवडणूक देखील लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर मात्र ते शिवसेनेत जास्त सक्रिय राहिले नाहीत.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने हे आपल्या समर्थकसह काँग्रेसमध्ये परतणार असल्याने प्रणिती शिंदेंसाठी ही गोष्ट दिलासा देणारी आहे.
आमदार नरसय्या आडम मास्तरांचीही पाठिंब्याची भूमिका
महाविकास आघाडीने सोलापूर मध्य विधानसभा आम्हाला सोडावी, लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसचा प्रचार करू असा प्रस्ताव माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी काँग्रेस समोर ठेवला आहे. प्रणिती शिंदेच्या विरोधात निवडणूक लढवलेली असली तरी भाजपा हाच आपला मुख्य विरोधक आहे, त्यांना हरवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला साथ देऊ अशी भूमिका आडम मास्तरांनी घेतलीय.
नरसय्या आडम म्हणाले की, आमचे कितीही मतभेद असले तरी आम्ही प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी तन, मन आणि धन लावून प्रयत्न करू, फक्त त्यानी मध्य विधानसभा मतदारसंघ विधानसभाआम्हाला सोडला पाहिजे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जवळपास दीड लाख मतदार हे माकपचे सदस्य आहेत. आज देशाचे संविधान धोक्यात आहे, इलेक्टोरोल बॉण्डचा इतका मोठा घोटाळा झाला. त्यामुळे आमचा विरोधक हा भाजप आहे, त्यामुळे सर्व मतभेद विसरून सोलापुरात काँग्रेसला साथ देऊ.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढाई होणार, हे आता स्पष्ट झालंय. तीन वेळा आमदार असलेल्या प्रणिती शिंदे आणि 2019 साली भाजपच्या तिकिटावर आमदार झालेले राम सातपुते यांच्यात ही लढाई रंगणार आहे. राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर होताच, प्रणिती शिंदे यांनी त्यांचं पत्र लिहून स्वागत केलंय. याच पत्रात त्यांनी सोलापूरच्या लढाईचे रंग कसे असणार आणि त्यात कळीचा मुद्दा काय असणार याचे संकेत दिले आहेत.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)