Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं! 'माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा' राहुल ढिकलेंच्या वक्तव्यावर गणेश गीतेंचा हल्लाबोल, म्हणाले 'तुमचा अजेंडा...'
Nashik East Assembly Constituency : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार राहुल ढिकले आणि शरद पवार गटाकडून गणेश गीते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार प्रचार केला जात आहे. त्यातच आता नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात (Nashik East Assembly Constituency) भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारामध्ये आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटात थेट लढत होत आहे. भाजपकडून विद्यमान आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikle) आणि शरद पवार गटाकडून गणेश गीते (Ganesh Gite) निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
माझे विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने काम सुरू आहे. येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा अजेंडा घेऊन मी मतदानाला सामोर जात आहे, असे भाजपचे उमेदवार राहुल ढिकले यांनी म्हटले आहे. तर निवडणूक वीस दिवस की दोन वर्षाची नसते. लोकांचा शरद पवारांवर विश्वास आहे. राहुल ढिकले यांचा निवडणुकीचा अजेंडा म्हणजे घरातल्या लोकांना टेंडर देण्याचा आहे, असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांनी राहुल ढिकलेंवर केला आहे.
राहुल ढिकलेंची गणेश गितेंवर टीका
विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा टप्पा हा शेवटाकडे येत आहे आणि त्यातच आता राजकीय वातावरण देखील तापू लागले आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात एकेकाळी एकमेकांचे मित्र असलेले निवडणुकीत कट्टर राजकीय विरोधक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार यांनी विरोधक असलेल्या शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांच्यावर गंभीर टीका केली आहे. वीस दिवसात पक्ष बदलून निवडणुका लढवता येत नाही. नाशिककरांना अजेंडा हवा आणि माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा आहे. आणि त्यावर मी निवडणूक लढवत असल्याचं नाशिक विभागाचे विद्यमान आमदार महायुतीचे उमेदवार राहुल ढिकले यांनी म्हटले आहे.
गणेश गितेंचा पलटवार
तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी करत असलेले गणेश गीते यांनी या सर्व आरोपांचे खंडन करत निवडणूक ही दिवसांवर नाही तर विकासावर लढवली जाते, असे म्हणत राहुल ढिकले यांच्याकडे घरातल्या घरात कॉन्ट्रॅक्ट देण्याचा अजेंडा असल्याचं म्हटले आहे. त्यामुळे आता नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आरोप-प्रत्यारोपाने चर्चेत आली आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून नेमकी कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा