Rohit Pawar : उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर रोहित पवार कडाडले; म्हणाले, महायुतीकडून जे चाललंय....
Maharashtra Assembly Elections 2024 : यवतमाळच्या वणी येथे उद्धव ठाकरे यांच्या बॅगची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली होती.
अहिल्यानगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून उमेदवारांसाठी प्रचार सभा घेत आहेत. तर सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल यवतमाळच्या वणी येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरमधून दाखल झाले. मात्र हेलिकॉप्टरमधून बाहेर पडताच उद्धव ठाकरे यांच्या बॅगची निवडणूक आयोगाकडून तपासणी करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे चांगलेच संतापल्याचे दिसून आले. तर त्यांनी तपासणी होत असताना व्हिडिओ काढत तो प्रसारित देखील केला. माझी बॅग तपासली तशी सत्ताधाऱ्यांची देखील बॅग तपासा, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार म्हणाले की,विरोधकांच्या बॅगा तपासायला लावणार हे द्वेषाचे राजकारण आहे. बॅगा तपासणारे कर्मचारी मध्य प्रदेशातील होते. राज्यात इतकी बेरोजगारी असताना बाहेर राज्यातले लोक नोकऱ्या मिळवतात, असा टोला रोहित पवारांनी महायुती सरकारला लगावला आहे. तर विरोधकांनी सत्तेचा गैरवापर करत काहीही करू देत निकालानंतर महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. मात्र महायुतीकडून जे चाललंय ते नाही, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.
रोहित पवारांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांचं सरकार पाडलं. त्यामुळे मला कोणी हलक्यात घेऊ नये, असं म्हटलं आहे. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून एकनाथ शिंदे यांनी आपल्याच मित्र पक्षाला असं म्हटले असावेत. कारण ज्या प्रकारे भाजपमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार निवडून येऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत, त्यावरून शिंदे यांनी असं म्हटलं असावं, असा टोला रोहित पवारांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.
रावसाहेब दानवेंना टोला
भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा प्रकार घडल्यानंतर राज्यभरातून या घटनेच्या विरोधात प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आता रोहित पवार यांनी देखील दानवे यांच्यावर टीका केली असून भाजपच्या नेत्यांमध्ये अहंकार आणि पैशाची मस्ती असल्याचे म्हटले आहे. लोकसभेमध्ये त्यांची ही मस्ती जनतेने जिरवली आहे आणि आजही त्यांचा मुलगा ज्या ठिकाणी निवडणूक लढवतोय त्या ठिकाणची जनता देखील त्याची मस्ती उतरवतील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा