शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
आदित्य ठाकरे यांनी आठ आमदार एक खासदार आपल्या संपर्कात आहे, असा दावा केला होता. त्यावर, बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पलटवार केला आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राजकीय नेते प्रचारसभांसाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. या सभांवेळी अनेक स्थानिक नेत्यांचा पक्षप्रवेशही केला जातोय. तर, जागावाटपात आपल्याला संधी न मिळाल्याने नाराज झालेल्या काही नेत्यांनी बंडखोरी केलीय, तर काहींनी आघाडी व युतीची धर्म पाळत पक्षासोबत राहणे पसंत केले आहे. दरम्यान, राज्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा सामना रंगल्याने राजकीय रंगत वाढली आहे. कारण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत तब्बल 40 आमदारांनी गुवाहटी गाठून उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. मात्र, शिंदेसोबत गेलेल्या आमदारांपैकी 8 आमदार आणि 1 विद्यमानमंत्री पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत परत येणार असल्याचा दावा शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मात्र, खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी हा दावा फेटाळून लावलाय.
आदित्य ठाकरे यांनी आठ आमदार एक खासदार आपल्या संपर्कात आहे, असा दावा केला होता. त्यावर, बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पलटवार केला आहे. जी लोकं तुमच्या संपर्कात आहेत, त्यांना बोलवून घ्या, माध्यमांसमोर ते दाखवा, अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना आव्हान दिलंय. एवढी लोक सोडून गेली, का सोडून गेली ती, का परत आली नाहीत? याचं आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला देखील खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे. त्यावरुन, आदित्य ठाकरेंच्या दाव्यात कुठलंही तथ्य नसल्याचंच श्रीकांत शिंदे यांनी सूचवलं आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जात असताना शिंदे गटातील एका मोठ्या मंत्र्याचा फोन आला होता. माझ्यासह 8 आमदार असून आम्ही मोठं बंड करत आहोत. उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागून परत येतो, असं मंत्र्याने सांगितल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केलाय. आम्ही तुम्हाला माफ करु शकत नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं. तसेच 2019 नंतर भाजपने 5 प्रमुख चेहरे आयात केले असल्याचेही एका वृत्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
बॅग तपासणीवरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा
दरम्यान, शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्यावरूनही श्रीकांत शिंदेंनी टोला लगावला आहे. जशी माझी बॅग तपासली तशी अर्धे मुख्यमंत्री आज आले आहेत, त्यांची पण तपासा म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर नाव न घेता खा. अमोल कोल्हे यांनी खोचक टोला लगावला होता. त्यावरही, श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बॅग तपासली तेंव्हा नळावर जशी भांडण होतात, तसे भांडत होते असा टोला लगावला.
हेही वाचा
नक्षलवादाला लगाम घालत या भागात आम्ही उद्योग आणले; चंद्रपुरात मोदींचं भाषण, काँग्रेस, मविआवर हल्लाबोल