Rajendra Raut : मी फुकलो असतो तरी उदयनराजे पडले असते, असं मनोज जरांगे म्हणाले होते; आमदार राजेंद्र राऊत यांचा दावा
आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मी फुकलो असतो तरी उदयराजे भोसले लोकसभा निवडणुकीत पडले असते, असं जरांगे म्हटले असल्याचा दावा राऊत यांनी केलाय.
Rajendra Raut on Manoj Jarange : "आम्ही जरांगेंसोबत बैठकीला बसलो होतो, त्यावेळी उदयन महाराजांचा विषय निघाला. जरांगे म्हणाले, थोडक्या मतांनी निवडून आले. मला त्यादिवशी खऱ्या अर्थाने धक्का बसला होता. मी माझ्या देवाची (शिवाजी महाराज) शपथ घेऊन सांगतो. तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवांनो मनोज जरांगेंचं वाक्य आहे की, मी फुकलो असतो तरी उदयनराजे पडले असते", असा दावा बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केला. ते बार्शीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांच्या मंत्रिमंडळाने तुम्हाला मान-सन्मान दिलाय
राजेंद्र राऊत म्हणाले, माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो. शिवरायांची शपथ सांगतो. ज्यावेळी मी जरांगे दादांबरोबर चर्चा केली. मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांच्या मंत्रिमंडळाने तुम्हाला मान-सन्मान दिलाय. तुमच्या काय मागण्या आहेत? मला व्यवस्थित सांगा. मी म्हणालो, तुमचे चार-पाच वकिल मला जोडून द्या. जे काही असेल ते मला व्यवस्थित समजून सांगा. नेमकं काय करायचंय? मी तुम्हाला पण कोर्टातील पद्धती सांगितल्या होत्या, मला त्या पद्धती माहिती आहेत. आम्ही पण चळवळीतील कार्यकर्ते आहोत. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, त्या घटनेच्या आधारावर सुद्धा आपल्याला काही अंशी चालावं लागणार आहे. काही कोर्ट कचेरी करावी लागणार आहे.
मनोज जरांगेंचे सहकारी म्हणाले, तुम्हाला काय करायचंय टिकू द्या अगर नाही टिकू द्या
पुढे बोलताना राऊत म्हणाले, मराठा-ओबीसी एक असेल तर आपण हायकोर्टात याचिका दाखल करु. डायरेक्शन मागू. त्याप्रमाणे तो प्रश्न आपण सोडवू. कितीही पैसे लागायचे ते सांगा. कोणी नाही दिले तर मी बघतो. ही माझी भाषा आहे बांधवांनो. हा विषय तुम्हाला मिटू द्यायचा नाही का? नेमकं मराठा आरक्षणाच्या विषयाच तुम्हाला काय करायचं आहे? त्याचं उत्तर मला द्या. सगेसोयरेच्या बाबतचा कायदा करायचा होता. त्याला सात साडेसात हरकती आल्या होत्या. आम्ही म्हणालो कोर्टात हे टिकलं पाहिजे. मनोज जरांगेंचे सहकारी म्हणाले, तुम्हाला काय करायचंय टिकू द्या अगर नाही टिकू द्या.
दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी राजेंद्र राऊत यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी बार्शीत घोंगडी बैठक घेणार असं म्हणाले होते. त्यानंतर राजेंद्र राऊत आक्रमक झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
चूक भूल करू नका, बापासोबत राहा; वस्तादने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका: अजित पवार