राहुल नार्वेकर यांना सत्र न्यायालयाचा दणका, 3 हजारांचा दंड ठोठावला, मविआ काळातील आंदोलन भोवणार?
Rahul Narvekar : भाजपच्या 20 पदाधिकाऱ्यांविरुद्ध मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. ज्यांच्यावर खटला सुरु आहे, त्यामध्ये राहुल नार्वेकर यांचंही नाव आहे.
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar BJP) यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून (Mumbai Session Court) दंड ठोठावण्यात आला आहे. राहुल नार्वेकर हे सुनावणीसाठी सतत गैरहजर राहिल्यानं न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. महाविकास आघाडी (MVA)सरकारच्या काळात, कोरोनाकाळात (Covid19) वीज दरवाढीविरुद्ध भाजपनं आंदोलन केलं होतं. या आंदोलनात बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण झाली होती. याचप्रकणात भाजपच्या 20 पदाधिकाऱ्यांविरुद्ध मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. ज्यांच्यावर खटला सुरु आहे, त्यामध्ये राहुल नार्वेकर यांचंही नाव आहे.
मात्र राहुल नार्वेकर हे सातत्याने सुनावणीसाठी गैरहजर राहिले. त्यामुळे मुंबई सत्र न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला. दरम्यान आता येत्या 8 जुलैला पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश कोर्टाकडून जारी करण्यात आले आहेत.
कोरोना काळात आंदोलन
महाविकास आघाडी सरकारच्या काळात 2020 मध्ये भाजपने अनेक ठिकाणी आंदोलनं केली होती. कधी मंदिरं उघडण्यासाठी तर कधी वीज दरवाढीविरोधात आंदोलनं करण्यात येत होती. मुंबई भाजपने वीजदरवाढीविरोधात आंदोलन केलं होतं. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, सर्व बंद असूनही बेस्ट प्रशासनाने भरमसाठी वीज बिले पाठवल्याचा आरोप भाजपचा होता. त्याविरोधात भाजपने आंदोलन केलं होतं. त्यावेळी भाजपने बेस्टच्या महाव्यवस्थापकांना घेराव घातला होता. यावेळी राहुल नार्वेकर, आमदार मंगलप्रभात लोढा, अतुल शाह यांच्यासह भाजपच्या 20 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता. गेल्या तीन वर्षांपासून हा खटला सुरु आहे. मात्र या खटल्याच्या सुनावणीसाठी राहुल नार्वेकर न आल्यामुळे त्यांच्यावर आता कोर्टाने 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
दरम्यान, राहुल नार्वेकर आणि मविआ यांच्यातील 'नातं' महाराष्ट्रासह संपूर्ण देशाने पाहिलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांना ट्रिब्युनल म्हणून काम पाहावं लागलं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रताप्रकरणात सुनावणी घेऊन निर्णय दिला होता.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची चर्चा
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. राहुल नार्वेकर यांचं नाव त्यावेळी चर्चेत होतं. मात्र महायुतीमध्ये ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे होती. त्यांच्याकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. यामिनी जाधव विरुद्ध ठाकरे गटाचे उमदेवार अरविंद सावंत यांच्यात लढत झाली. यावेळी अरविंद सावंत यांनी यामिनी जाधव यांचा पराभव केला.
संबंधित बातम्या