(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मी डॅडींच्या पक्षाचा एक सदस्य, गीता गवळींची साथ सोडणार नाही, राहुल नार्वेकरांनी थेट अरुण गवळींच्या दगडी चाळीशी नातं जोडलं!
मुंबईतील 4 मतदारसंघात शिवसेनेनं महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर केले आहेत.
मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने कंबर कसली असून महायुतीला (Mahayuti) ४५ पेक्षा जास्त जागांवर विजयी करण्याचा चंग बांधला आहे. मात्र, जागावाटपावरुन अद्यापही महायुतीत एकमत नसल्याचे दिसून येते. कारण, ठाणे, कल्यासह मुंबईतील काही जागांवर अद्यापही महायुतीचा उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे, या जागांवरील उमेदवारीचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या उमेदवारीचीही चर्चा जोर धरत असून दक्षिण मुंबईतील मतदारसंघात त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे दगडी चाळीतला डॅडी आणि डॉन अरुण गवळींच्या (Arun Gavali) दगडी चाळीशी नातं जोडण्याचा प्रयत्न राहुल नार्वेकरांनी केला आहे. प्रचारादरम्यान, एका भाषणात त्यांनी अरुण गवळींची स्तुती करताना गीता गवळींना मुंबईचा महापौर बनविण्याचा निर्धार केला आहे.
मुंबईतील 4 मतदारसंघात शिवसेनेनं महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, दक्षिण मुंबईतील मतदारसंघातून अद्यापही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली असून अरविंद सावंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर, महायुतीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. नार्वेकर यांची उमेदवारी अद्याप जाहीर झाली नाही. तरीही, त्यांनी थेट दगडी चाळीशी नातं जोडून प्रचाराचा शुभारंभ केला आहे. नार्वेकर यांच्याकडून दगडी चाळ केंद्रस्थान असलेल्या भायखळा येथून जोरदार प्रचार सुरू झाला आहे. डॉन अरुण गवळींचा पक्ष असलेल्या अखिल भारतीय सेनेच्या परिवाराला एक नवीन सदस्य जोडला आहे, असे म्हणत नार्वेकरांनी डॅडींवर स्तुतीसुमने उधळली.
''मी विधानसभा अध्यक्ष आहे, माझे अधिकार मला माहिती आहेत. त्यामुळे, मी अखिल भारतीय सेनेची साथ कधीही सोडणार नाही. डॅडींप्रमाणेच अ. भा. सेनेच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडून प्रेम मिळेल,'' अशा शब्दात त्यांनी अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केलं. तसेच, अखिल भारतीय सेनेच्या परिवारात एक सदस्य आलाय असं समजा, या बहिणीला भावाची साथ निव्वळ लोकसभा निवडणुकीसाठी नाही, तर मुंबईची महापौर होईपर्यंत राहील असेही नार्वेकर यांनी म्हटले. विधानसभा अध्यक्ष असल्याने नार्वेकरांनी केलेल्या विधानाची सोशल मीडियात चर्चा सुरू झाली आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
दक्षिण मुंबईतून महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली आहे. १४ एप्रिल रोजी त्यांनी भायखळ्यातील हेरीटेज हॉटेलमध्ये घेतलेल्या प्रचारसभेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामधील त्यांच्या भाषणाची चर्चा जोरात असून अनेकांनी त्यांना ट्रोलही केलं आहे.
डॅडीची लवकरच होणार सुटका
दगडी चाळीतला डॅडी आणि गुंड अरुण गवळी सध्या एका खून प्रकरणात शिक्षा भोगत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच गवळीची सुटका होणार असल्याचे वृत्त माध्यमांत झळकले. कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. तसेच, उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही खंडपीठाच्या वतीनं देण्यात आला आहे. 2006 च्या शासन निर्णयाच्या आधारावर कुख्यात डॅान अरुण गवळीनं शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. त्यावर, न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यामुळे, लवकरच अरुण गवळी तुरुंगातून बाहेर येऊन मोकळा श्वास घेऊ शकतो.
संबंधित बातम्या