Kiran Samant : 'नॉट रीचेबल' किरण सामंत अखेर अवतरले, 15 मिनिटे बाकी असताना रत्नागिरीत मतदानाचा बजावला हक्क
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election : जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत हे मतदान संपण्यापूर्वी 15 मिनिटे आले आणि मतदानाचा हक्क बजावला.
सिंधुदुर्ग : रत्नागिरीतील शिवसेना नेते किरण सामंत (Kiran Samant) अखेर समोर आले असून त्यांनी पाली या त्यांच्या मूळगावी मतदानाचा हक्कही बजावला. किरण सामंत हे सकाळपासून नॉट रीचेबल होते, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. आपल्या सीम कार्डच्या प्रॉब्लेममुळे आपण नॉट रीचेबल होतो, पण आपले ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड हे कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याची प्रतिक्रिया किरण सामंत यांनी दिली.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा चुरशीची निवडणूक होत असून भाजपकडून नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून सावधगिरीचं राजकारण केलं गेलं. अशातच या ठिकाणी उत्सुक असलेले किरण सामंत मात्र ऐन मतदानाच्या दिवशीच नॉट रिचेबल होते.
शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराची कमान सांभाळणारे किरण सामंत यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचं दिसून आलं. या मतदारसंघात सामंत बंधुंची राजकीय ताकद ही निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सीम कार्डच्या नेटवर्कमुळे नॉट रीचेबल
मतदान संपण्यापूर्वी केवळ 15 मिनिटे आधी किरण सामंत हे त्यांच्या पाली या मूळ गावी मतदानासाठी आले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. किरण सामंत म्हणाले की, "सोमवारी रात्री आपण 12 वाजेपर्यंत निवडणुकीचं काम करत होतो. मंगळवारी सकाळी 8 वाजता प्रचारासाठी बाहेर पडलो. पण मोबाईलमधील सिम कार्डच्या प्रॉब्लेममुळे आपण नॉट रीचेबल होतो. पण माझ्या ड्रायव्हरचे आणि बॉडीगार्डचे मोबाईल सुरू असल्याने त्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या संपर्कात होतो."
किरण सामंत यांना सुरक्षा द्यावी, वैभव नाईकांची मागणी
ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, किरण सामंत हे आज सकाळपासून नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर आल्या आहेत. कोकणात झालेल्या या आधीच्या निवडणुकांमध्ये दहशतवादी प्रवृत्तीने कायम डोके वर काढले आहे. ही दहशतवादी प्रवृत्ती आज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना समोर पराभव दिसू लागल्याने त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे किरण सामंत यांना तातडीने पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे.
ही बातमी वाचा: