NCP Sunil Tatkare: बाप-लेकीला बाजूला राहू दे, तुम्ही इकडे या! सुनील तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर दिल्याचा दावा
Sharad Pawar camp & Ajit Pawar NCP: एकेकाळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मानाचे स्थान असणारे सुनील तटकरे यांनी आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना सोडून आमच्याकडे या, अशी ऑफर खासदारांना दिली आहे.
मुंबई: राष्ट्रीय राजकारणातील आपले स्थान भक्कम करण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पडद्यामागे हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून अजितदादांकडून शरद पवार गटाच्या खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे समजते. अजित पवार यांनी शरद पवार गटाचे (Sharad Pawar Camp) खासदार आपल्या गोटात खेचून आणण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर सोपवल्याची माहिती आहे. त्यानुसार सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांना वगळून शरद पवार गटाच्या 7 खासदारांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत बोलताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना सोडून तुम्ही इकडे या, असे सुनील तटकरे यांनी संबंधित खासदारांना सांगितल्याचा दावा आव्हाड यांनी केला.
एका बाजुला शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहेत, अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, तसे असते तर सुनील तटकरे यांनी आमच्या खासदारांना त्यांच्याकडे येण्याची ऑफर दिली नसती. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात एकत्र येण्याची चर्चा सुरु असती तर सुनील तटकरे यांना ते माहिती असते. परंतु, ते आमच्या खासदारांना सांगत आहेत की, 'बापाला आणि मुलीला राहू दे, बाजूला तुम्ही या', असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. ते मंगळवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
सुनील तटकरे यांना शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेले नको आहेत. आम्हालाही त्यांच्यासोबत जायचे नाही. तुम्ही आमचा पक्ष आणि निशाणी नेली, आता आमचे खासदारही नेत आहात. सुनील तटकरे यांनी आमच्या खासदारांना फोन केले पण त्यांची ऑफर धुडकावण्यात आली. सगळ्यांनीच तुमच्याप्रमाणे कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलेलं नसतं. हा सगळा प्रकार राष्ट्रीय राजकारणात नितीश कुमार यांना धाकात ठेवण्यासाठी केला जात आहे. भाजपकडून नितीश कुमार यांना 'देखो वो आ रहा है', 'उद्धव ठाकरे आ रहे है', 'शरद पवार आ रहे है', असे सांगितले जात आहे. राष्ट्रीय राजकारणावर या सगळ्याचा परिणाम होत असतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
केंद्रात मंत्रीपद मिळवण्यासाठी शरद पवार गटाचे खासदार फोडण्याचा प्रयत्न: संजय राऊत
जोपर्यंत पवारसाहेब यांचे खासदार फुटत नाही तो पर्यंत राष्ट्रवादीला मंत्रीपद मिळणार नाही. हे मंत्रीपद प्रफुल पटेल यांना हवे आहे, तो कोटा पूर्ण करा तरचं मंत्रीपद मिळेल, असे भाजपकडून सांगण्यात आलं आहे. या सगळ्यामुळे अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलीन होत आहे. आज ना उद्या तुमच्याही राजकारणातल्या तिरड्या उचलल्या जाणारच. देशाच्या इतिहासात यांची नावं अत्यंत वाईट पद्धतीने घेतली जातील, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले.
आणखी वाचा