Kadsiddheshwar Maharaj: कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराजांवर लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; गुन्हा दाखल होताच नेमकं काय म्हणाले?
Kadsiddheshwar Maharaj: लिंगायत समाज तोडण्याचे कर्नाटकात महापाप लोकप्रतिनिधी आणि सरकार करत आहे. ते म्हणाले की, प्रत्यक्षपणे हिंदू धर्म तोडण्याचं काम करत होते, त्यामुळे असं करू नये हे मी बोललो.

Kadsiddheshwar Maharaj: सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील बिळूरमध्ये प्रवचनात लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकरगौंड शिवनगौंड बिरादार (रा. बसवन बागेवाडी ता. बसवन बागेवाडी जि. विजयपूर) यांनी फिर्याद दिली आहे. धर्माच्या आरक्षणावरून काडसिद्धेश्वर महाराज यांनी वक्तव्य केले होते. कर्नाटकमधील बसवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो आता जत पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
कर्नाटक सरकार महापाप करत आहे
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर काडसिद्धेश्वर महाराज यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कर्नाटकात लिंगायत समाज तोडणाऱ्या नागरिकांबाबतीत जतमध्ये कडक टिप्पणी केली होती. लिंगायत समाज तोडण्याचे कर्नाटकात महापाप लोकप्रतिनिधी आणि सरकार करत आहे. ते म्हणाले की, प्रत्यक्षपणे हिंदू धर्म तोडण्याचं काम करत होते, त्यामुळे असं करू नये हे मी बोललो. संबंधित मंत्री आणि कर्नाटक सरकारने कुत्सितपणे जाऊन तक्रार दाखल केली.
राजकीय दबावापोटी हा गुन्हा दाखल
त्यांनी पुढे सांगितले की, राजकीय दबावापोटी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोडसाळपणाने हा गुन्हा दाखल केला आहे. समाज जोडण्यासाठी, टिकवण्यासाठी खूप काम करावे लागते, तोडण्यासाठी जास्त काम करावे लागत नाही. हेच सांगण्याचा मी प्रयत्न माझ्या प्रवचनातून केला. मात्र, अतिशय खोडसाळपणे हा गुन्हा दाखल केला आहे, यामध्ये केवळ राजकारण आहे.
कारवाईवर पोलिस काय म्हणाले?
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांचे 9 ऑक्टोबरला बिळूर विरक्त मठात प्रवचन झाले होते. त्या प्रवचनातील वक्तव्यांवर फिर्यादी बिरादार यांनी आक्षेप घेतला आहे. द्वेषभावना पेरण्याच्या उद्देशाने एकोप्याला धक्का आणणारे वक्तव्य केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी जत पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
कोण आहेत काडसिद्धेश्वर महाराज?
पूज्यश्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी 1989 मध्ये मठाधिपती पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी आरोग्य, शिक्षण, गावविकास, शेती आणि संस्कृती या क्षेत्रांत अनेक उपक्रम राबवून आत्मनिर्भर समाज घडवण्याचे काम केले. 1991 पासून पूज्यश्री यांनी समाजातील वंचित आणि दुर्बल लोकांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी कणेरी गावाला आपली ‘कर्मभूमी’ मानली. गावातील समस्या सोडवण्यासाठी सरकारवर अवलंबून राहू नये. तरुणांनी स्वतः पुढे येऊन आपल्या गावाच्या विकासाची जबाबदारी घ्यावी. अशा प्रकारे त्यांनी तरुणांना आत्मनिर्भरतेच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























