Ajit Pawar: आपली चूक मान्य करून पक्ष अन् चिन्ह पवार साहेबांना देऊन टाका, अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने डिवचलं!
Ajit Pawar: घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे समाजाला आवडत नाही. आम्ही पण अनुभव घेतलाय, मी चूक मान्य केलीय, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं त्यावर आता शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या वेळी गडचिरोलीमधील अहेरीत पक्षात पडलेली आणि घरात पडलेली फूट याबाबत भाष्य केलं. घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे समाजाला आवडत नाही. आम्ही पण अनुभव घेतलाय, मी चूक मान्य केलीय, असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं होतं त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी महेश तपासे यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी अजित पवार यांना खरोखर पश्चाताप झाला असेल तर त्यांनी तत्काळ शरद पवारांचा पक्ष शरद पवारांचे चोरलेले आमदार माघारी द्यावेत. अजित पवारांनी ज्याप्रकारे वक्तव्य केलं त्यावरून असं स्पष्ट होतं. शरद पवारांशिवाय अजित पवारांची (Ajit Pawar) किंमत ही शून्य आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आता त्यांनी आपली चूक मान्य करून पक्ष आणि चिन्ह देऊन टाकावं अन्यथा अजित पवारांनी आज केलेले वक्तव्य केवळ भावनिक आव्हान करणारं राजकारणाचा एक भाग म्हणून केलेलं वक्तव्य असं मानलं जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांनी आपली बोलून दाखवली खंत
अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीचा जो विकास केलेला आहे तो पाहिला जगभरातून लोक येतात असं असताना देखील सुनेत्रा पवार यांच्यासाठी आवाहन अजित पवार यांनी करूनही त्यांचा पराभव झाला यामुळेच अजित पवारांनी आपली खंत बोलून दाखवली असावी असं त्यांच्या भाषणातून वाटतं. कदाचित बारामतीच्या जनतेने ठरवलं असेल लोकसभेला ताई विधानसभेला दादा त्यामुळे नक्कीच बारामती विधानसभेमध्ये आपल्याला अजित पवारांच्या (Ajit Pawar) पाठीमागे जनता उभी राहिलेली पाहायला मिळेल. अजित पवार म्हणाले की, दुसरा आमदार मिळाल्यानंतर तुम्हाला कळेल की मी किती नेमकं काम केलेला आहे. त्यामागचं कारण असं मोठ्या प्रमाणात अजित पवारांनी विकास काम बारामतीत केली मात्र लोकसभेचा निर्णय वेगळा लागला एवढेच आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
आम्ही आणि धर्मरावबाबा आत्राम यांनी इतरांना शिकवलं आहे. वस्ताद त्याच्या हाताखाली शिकतो त्याला सगळे डाव शिकवत नाही. वस्ताद एक डाव राखून ठेवतो. अजूनही चूकभूल करु नका, तुमच्या वडिलांसोबत राहा. वडील लेकीवर प्रेम करतात तेवढं प्रेम लेकीवर करु शकत नाही, असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही, समाजाला हे आवडत नाही, आम्ही अनुभव घेतलेला आहे, मी चूक मान्य केली. वस्तादांनी एक डाव राखून ठेवलेला आहे, तो दाखवायची वेळ आणू नका, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार (Ajit Pawar) यांनी हा इशारा धर्मारावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांना दिला होती.