NCP Crisis: शरद पवार गटाला दिलासा, लोकसभा निवडणुकीपर्यंत 'तुतारी' वापरता येणार; सुप्रीम कोर्टाचे आदेश
Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाला तुतारी आणि अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह वापरण्याची सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची नोंदणी करण्यात यावी. केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी सुरु असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वपूर्ण निर्देश दिले. शरद पवार गटाला (Sharad Pawar Camp) राज्यसभा निवडणुकीसाठी 'तुतारी वाजवणारा माणूस' (Tutari Symbol) हे पक्षचिन्ह देण्यात आले होते. परंतु, राज्यसभेची निवडणूक झाल्यानंतर शरद पवार गटाला हे चिन्ह मिळू नये, यासाठी प्रयत्न सुरु झाले. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी शरद पवार गटाला मोठा दिलासा दिला. त्यानुसार आता शरद पवार गटाला लोकसभा निवडणूक होईपर्यंत 'तुतारी' हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे पक्षाचे नाव वापरता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगालाही निर्देश दिले आहेत. लोकसभा निवडणूक होईपर्यंत तुतारी हे चिन्ह कोणालाही देऊ नये. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची नोंदणी करण्यात यावी, असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.
घड्याळ चिन्ह अजित पवारांकडेच राहणार
अजित पवार यांना देण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह गोठवावे, अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह दिल्यास ग्रामीण भागातील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुर्तास अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह देऊ नये, अशी मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे कायम ठेवले. मात्र, या खटल्याच्या अंतिम निकालानुसार या निर्णयात बदल होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडेच राहील, याबाबत शाश्वती नाही, असे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिले.
घड्याळ चिन्हाबाबत संभ्रम टाळण्यासाठी तीन भाषांमध्ये नोटीस देण्याची मागणी
शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आपल्या युक्तिवादामध्ये म्हटले की, अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरण्यास परवानगी देऊ नये. लोकसभा निवडणुकीपर्यंत घड्याळ चिन्ह गोठवावे. अन्यथा ग्रामीण भागातील जनतेला घड्याळ हे चिन्ह शरद पवारांचेच आहे, असे वाटेल. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. घड्याळ या चिन्हामुळे संभ्रम टाळण्यासाठी अजित पवार यांनी हिंदी, इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रांमध्ये पब्लिक नोटीस द्यावी. या नोटीसमध्ये घड्याळ हे चिन्ह माझ्याकडे असल्याचे सांगावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. यावेळी अजित पवार गटाकडून आम्ही भविष्यात प्रचारात शरद पवार यांचा फोटो किंवा नाव वापरणार नाही, असे हमीपत्रही न्यायालयात जमा केले.
आणखी वाचा