Gokul Zirwal : 'ती' कुशंका अखेर खरी ठरली, नरहरी झिरवाळांच्या मुलाची अजितदादांच्या जनसन्मान यात्रेला दांडी, मनात नेमकं चाललंय तरी काय?
Gokul Zirwal : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेकडे पाठ फिरवली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नाशिक : उपमुखमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) आजपासून (दि. 8) जनसन्मान यात्रेचे (Jansanman Yatra) आयोजन करण्यात आले आहे. नाशिकच्या दिंडोरी (Dindori) येथून यात्रेला सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा या यात्रेचा पहिला टप्पा असणार आहे. मात्र अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेकडे अजित पवार गटाचे नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) यांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून झिरवाळ कुटुंबीय हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांसोबत (Sharad Pawar) जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. गोकुळ झिरवाळ यांनी माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील. संधी मिळाली तर वडिलांविरोधात निवडणूक लढेल, असे वक्तव्य केले होते. यानंतर दिंडोरीत झालेल्या अजित पवार गटाच्या मेळाव्यात नरहरी झिरवाळ यांनी मी अजित पवारांसोबत राहणार असल्याचे जाहीर केले. तर गोकुळ झिरवाळ माझा मुलगा आहे. त्याला आमदार करायचे असेल तर मी अजितदादांना सांगेन, असेही नरहरी झिरवाळ यांनी म्हटले होते.
मी शरद पवार यांच्यासोबत : गोकुळ झिरवाळ
आता नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेकडे पाठ फिरवली आहे. आजचा यात्रेला गोकुळ झिरवाळ उपस्थित नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. गोकुळ झिरवाळ यांनी एबीपी माझाशी बोलताना मी शरद पवार यांच्या सोबत असून आगामी निवडणुक लढण्याचे देखील त्यांनी संकेत दिले आहेत. यामुळे आता दिंडोरी विधानसभा मतदारसंघात नरहरी झिरवाळ विरुद्ध गोकुळ झिरवाळ अशी लढत पाहायला मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय म्हणाले होते नरहरी झिरवाळ?
राष्टवादी अजित पवार गटाच्या मेळाव्यात भाषण करताना नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं होतं की, दादा म्हणजे फणस आहे. वरून काटे आणि आतमध्ये गरे आहेत. त्यात बिया सर्वांचा वापर होतो. कोणी काहीही बोलले तरी लक्ष देऊ नका. गोकुळ माझा मुलगा आहे. त्याला आमदार व्हायचे असेल तर मी दादांना सांगेल त्याला आमदार करा. त्याच्याविषयी बातम्या सुरू आहे. पण तो आता दादांनी दिलेल्या फ्लॅटवर मुंबईमध्ये काम करतोय, असे स्पष्टीकरण नरहरी झिरवाळ यांनी दिले होते.
आणखी वाचा