मोठी बातमी : नाशिकमधील शरद पवारांचा निष्ठावंत अजित पवारांच्या गळाला? जनसन्मान यात्रा सुरु होताच मोठा गेम
Ajit Pawar vs Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज नाशिकपासून सुरु झाली आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी अजित पवार हे शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाशिक जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्ते श्रीराम शेटे (Shriram Shete) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीसोबत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
कारण मागील आठवड्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना श्रीराम शेटे यांनी त्यांच्या स्वागताला उपस्थितीत राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाण्यासंदर्भातले संकेत दिले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिंडोरी येथे पार पडणाऱ्या सभेच्या ठिकाणी शेटे यांचे मोठ-मोठे फ्लेक्स देखील लावण्यात आलेले आहेत.
श्रीराम शेटे भूमिका बदलणार?
त्यामुळे आता शेटे यांनी भूमिका बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे. शेटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतरचे नाशिक जिल्ह्यातील पक्षाचे पहिले जिल्हाध्यक्ष होते. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला त्यावेळी नाशिक जिल्ह्यातील आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले. मात्र श्रीराम शेटे यांनी कोणत्याही परिस्थितीत शरद पवारांची साथ सोडणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यांना अनेक जुन्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साथ दिल्याचा पाहायला मिळाले होते. आता मात्र शेटे यांनी आपली भूमिका बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जनसन्मान यात्रा सुरू होण्याआधी गोंधळ
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला आज नाशिकच्या दिंडोरीतून सुरुवात होत आहे. मात्र, जनसन्मान यात्रा सुरू होण्याआधी विमानतळाच्या गेटवर काहीकाळ गोंधळ झाल्याचे दिसून आले. आर्मी गेट मधून गाड्या विमानतळाच्या आतमध्ये जाण्यावरून वाद झाला. अजित पवार यांच्या यात्रेतील पिंक गाड्या काही वेळ विमानतळाच्या गेटमधून न सोडल्याने गोंधळ झाला. त्यानंतर पोलीस आणि आर्मीच्या लोकांमध्ये चर्चा झाल्यानंतर गाड्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला.
अजित पवार चार दिवस नाशकात
उपमुख्यमंत्री अजित पवार जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. या यात्रेची सुरुवात आज नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून होत आहे. यात्रेची सुरुवात जोरदार व्हावी, यासाठी पक्षाच्या वतीने तयारी करण्यात आलेली आहे. या परिसरात पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता पावसापासून संरक्षण करणारे छत सभेच्या ठिकाणी उभारण्यात आले आहे. आजच्या सभेला पक्षाचे सर्व वरिष्ठ मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. पुढील चार दिवस अजित पवार नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये जाऊन सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करणार आहेत.
आणखी वाचा