आतंकवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी हिंदीच काय, राज्यात उर्दू सुद्धा शिकवली पाहिजे; आ. गायकवाडांचा अजब तर्क
देशभरात पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक पर्यटक जखमी झाले आहेत.

बुलढाणा : राज्यात काही दिवसांपूर्वी शाळेत इयत्ता पहिलीपासून हिंदी (Hindi) भाषेची सक्ती करण्यात आल्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला होता. अखेर, मनसेसह विरोधी पक्षाच्या तीव्र इशाऱ्याने सरकारने शासन आदेश नव्याने निर्गमित करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, केंद्र सरकारची तीन भाषा धोरण आपल्या बोर्डाने स्वीकारल्याचेही शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी त्याचवेळी स्पष्ट केले आहे. त्यानंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. सध्या राज्यातील भाषेचा वाद तात्पुरता मिटला असतानाच आता शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे बुलढाण्याचे (Buldhana) आमदार संजय गायकवाड यांनी राज्यात उर्दू भाषा देखील शिकवली पाहिजे, असे वक्तव्य केलं आहे.
देशभरात पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. या घटनेवर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच, आमदार संजय गायकवाड यांनी अजबच तर्क लावला आहे. या घटनेवर बोलताना त्यांनी राज्यातील भाषेचा मुद्दाही अधोरेखित केला आहे. हिंदी भाषेला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांवर त्यांनी निशाणा साधला.
हिंदी भाषेला विरोध करून काही पक्ष राजकारण करत आहेत. मात्र, हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे, सगळीकडे हिंदी बोलल्या जाते. मी तर म्हणेन आतंकवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी हिंदीच काय तर राज्यात उर्दू सुद्धा शिकवल्या गेलीच पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी केले. आमदार गायकवाड यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, पहलगाम हल्ला हा मुस्लिम आतंकवादाचा चेहरा, यातील दहशतवाद्यांनी धर्म, लिंग तपासून गोळ्या घातल्या हे धक्कादायक, या आतंकवाद्यांना पकडून त्यांचा माना छाटल्या पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
संजय राऊतांवर टीका
संजय राऊत यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसतं. ते नालायक माणूस आहे, असे म्हणत आमदार गायकवाड यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. तर, एकनाथ शिंदे हे येत्या 27 तारखेला बुलढाण्यात कार्यकर्त्यांचे आभार मानायला येत आहेत, अशी माहिती देखील त्यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
पाकिस्तानचा झेंडा जाळून काश्मिर हल्ल्याचा निषेध
जम्मू -काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कणकवली पटवर्धन चौकात तीव्र निषेध केला. यावेळी पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून तो जाळण्यात आला. पाकिस्तान मुर्दाबाद! फेक-दो, फेक-दो पाकिस्तान को फेकदो, केंद्र सरकार हाय हाय! अशा घोषणा देण्यात आल्या. माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोंदविण्यात आला.
हेही वाचा
अमित शाहांचा MIM च्या असदुद्दीन ओवैसींना फोन; पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री अॅक्शन मोडवर

























