(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sandipan Bhumre: 'पहाटे गद्दारी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नयेत'; अजित पवारांना भुमरेंचं प्रत्युत्तर
Sandipan Bhumre: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या टीकेला आता संदिपान भुमरे यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.
Sandipan Bhumre On Ajit Pawar: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) शनिवारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांनी पैठणच्या सभेतून रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली होती. एवढचं नाही तर 40 जणांनी गद्दारी केल्याचा देखील उल्लेख केला होता. तर त्यांच्या याच टीकेला आता संदिपान भुमरे यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. 'पहाटे गद्दारी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नयेत', अशा खोचक शब्दात भुमरे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. सिंधुदुर्गमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत असताना त्यांनी असे म्हटले आहे.
यावेळी बोलताना संदिपान भुमरे म्हणाले की, अजित दादा यांच्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती. अजित पवार आता खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. अजित दादा अशा टीका का करू लागले, कारण त्यांना आम्ही सत्तेतून पाय उतार केले आहे. त्यामुळे ते खालच्या पातळीवर जाऊन आमच्यावर टीका करू लागले आहेत. त्यांना म्हणावं तुम्ही कितीही टीका करा, पण 2024 ला महायुतीतीच सत्ता येणार आहे. सर्व आमदार आणि खासदार आमचेच निवडून येणार आहे. तर अजित पवार यांनी आम्हाला 40 आमदार फुटल्याच शिकवू नयेत, कारण ते पाहटे कुठे गेले होते. त्यामुळे अजित पवार यांनी आम्हाला गद्दार म्हणू नयेत, कारण पाहटे कोणी गद्दारी केली हे सर्वांना माहित असल्याचं भुमरे म्हणाले.
अजित पवारांनी केली होती टीका...
दरम्यान अजित पवार शनिवारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना, त्यांच्या उपस्थितीत पैठणला शेतकरी मेळावा झाला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी भुमरे यांच्यावर टीका केली होती. पैठणला जायकवाडी सारखा धरण असताना विकास झाला नाही. मात्र सत्तेत आल्यावर आणि पालकमंत्री झाल्यावर भुमरे यांनी दारूचे 9 दुकाने उघडली. एवढच नाही तर दुकानात ग्राहकांनी यावे म्हणून, रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकले असल्याचं अजित पवार म्हणाले होते. तसेच 40 लोकांनी गद्दारी केल्याने महाविकास आघाडी सरकार पडल्याचं देखील अजित पवार म्हणाले होते.
भुमरेंच्या वाईन शॉपची सर्वत्र चर्चा?
भुमरे यांच्या अनेक दारूच्या दुकानं आणि वाईन शॉप असल्याची टीका सतत विरोधकांकडून करण्यात येत आहे. यापूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पैठणच्या सभेतून अशीच टीका केली होती. त्यानंतर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील अशीच टीका केली होती. तर आता अजित पवार यांनी देखील भुमरे यांच्या दारूच्या दुकानाबाबतचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे सद्या औरंगाबादच्या राजकारणात दारूची दुकाने आणि भुमरे अशी चर्चा पाहायला मिळत आहे. तर यावरून भुमरे यांनी देखील विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: