परभणीतून निवडून आलो नाही, तर संन्यास घेईन; महादेव जानकरांची घोषणा, उद्धव ठाकरेंना पहिल्यांदाच इशारा
दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आज प्रचाराचा शेटवचा दिवस असून सभांचा धडाका सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी उद्धव ठाकरेंच्या परभणीतील सभेला प्रत्त्युत्तर दिलं आहे
परभणी : विदर्भ आणि मराठवाड्यात दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या निवडणूक प्रचारांच्या तोफा आज थंडावणार आहेत. येथील मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान (Voting) होत असून तत्पूर्वी बड्या नेत्यांनी प्रचाराच्या मैदानातून आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच लावली आहे. अमरावतीमध्ये आज केद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि काँग्रेस नेते राहुल गांधींची सभा होत आहे. तर, परभणीमध्ये शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) मंगळवारी सभा पार पाडली. या सभेतून भरपावसात उद्धव ठाकरेंनी परभणीकरांना साद घालताना, समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करण्याचं आवाहन केलं. उद्धव ठाकरेंच्या या सभेतील विधानावर रासपचे प्रमुख आणि परभणीतील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर (Mahadeo Jankar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी, विजयाचा विश्वास व्यक्त करताना, मोठी घोषणाच केली.
दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आज प्रचाराचा शेटवचा दिवस असून सभांचा धडाका सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी उद्धव ठाकरेंच्या परभणीतील सभेला प्रत्त्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्याचं पोरगं मुख्यमंत्री झालेलं आणि माझ्यासारखा बहुजन पोरगा खासदार झालेला देखवत नाही का, असा सवाल महादेव जानकरांनी विचारला. तसेच, 26 एप्रिल नंतर मी राज्यभरात उद्धव ठाकरेंच्या विरोधात रान पेटवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
महायुतीचे परभणीतील उमेदवार महादेव जानकर आज परतूर तालुक्यात सभा,पदयात्रा करत आहेत.मागच्या महिन्याभरामध्ये परभणी लोकसभा मतदारसंघातील लोकांनी मला आपलंसं केलं.मी जवळपास 90 टक्के मतदारसंघ फिरलोय, लोकं माझ्या पाठीशी आहेत. लोकसभा निवडणुकीत माझी लीड साडेचार लाखांची राहील, आणि मी जर परभणीतून निवडून आलो नाही तर संन्यास घेईल, अशी घोषणाच महादेव जानकर यांनी केली. दरम्यान, परभणीत रासपचे महादेव जानकर विरुद्ध महाविकास आघाडीचे संजय बंडू जाधव यांच्यात काँटे की टक्कर होत आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी परभणीत सभा घेऊन, महादेव जानकर यांना लहान भाऊ संबोधले. तसेच, माझ्या लहान भावाला दिल्लीत पाठवा, असेही मोदींनी म्हटले. त्यामुळे, जानकरांचा विश्वास दुणावला आहे.
26 एप्रिलनंतर रान पेटवणार
शेतकऱ्याचे पोरगं मुख्यमंत्री झालेलं आणि माझ्यासारखं बहुजन पोरगं खासदार झालेले उद्धव ठाकरे अन आदित्यला देखवत नाही का, असा सवाल महादेव जानकर यांनी विचारला. तसेच, माझ्यावर दोघांकडून अशा प्रकारे टीका होईल, ही अपेक्षा नव्हती. त्यामुळे, मी आता 26 एप्रिलनंतर राज्यभरातील ज्या लोकसभा मतदारसंघात निवडणूक होते, तिथं उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी विरोधात रान पेटवणार असल्याचेही जानकर यांनी जाहीर केले.
जानकरांचं डिपॉझिट जप्त करा - ठाकरे
महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव ह्यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंनी परभणीत सभा घेतली. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. तुम्ही प्रेमाने आलात तेव्हा आम्ही मिठी दिली होती, पण आता माझी वाघनखे बाहेर आली आहेत, अशा शब्दात भाजपाला इशारा दिला. अब की बार, भाजपा तडीपार करायची आहे. कारण, हे आपला महाराष्ट्र लुटत आहेत, आपले उद्योग पळवून नेत आहेत. त्यामुळे, बंडु जाधव यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या आणि समोरच्याचं डिपॉझिट जप्त करा, असे म्हणत महादेव जानकरांचं डिपॉझिट जप्त करा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी परभणीतील सभेतून केलं होतं. यावेळी, भरपावसात परभणीकरांनी सभा ऐकली, तर उद्धव ठाकरेंनीही भरपावसात आपलं भाषण पूर्ण केलं.